टेलिव्हिजनवरील मालिकांमधील नाट्य प्रेक्षकांना आवडत असते तसेच पडद्यामागे काय घडत असते याबद्दलही जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता असते. ‘आई कुठे काय करते’ मालिके मुख्य भूमिका साकारणारे मिलिंद गवळी यांनी ती उत्सुकता थोड्याफार प्रमाणात शिथिल करत त्यांच्या आणि आप्पांच्या सेटवरील ‘ट्युनिंग’ बद्दल एक दिलखुलास पोस्ट टाकली आहे. त्यात मिलिंद यांनी लिहिले आहे की, ‘माझी आणि त्यांची ओळख आई कुठे काय करते च्या सेटवरच झाली. पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या मिश्किल स्वभावाने मन जिंकून घेतलं. पण एकदा का तार सटकली मग ते कुणाचच ऐकत नाहीत. या दीड वर्षांमध्ये एकदा दोनदाच ते रागावले होते आणि क्षणात शांतही झाले. कारण काय तर कोणी तरी त्यांचा चार्जर लंपास केला आणि त्यांना त्यांचा मोबाइल चार्ज करता आला नाही आणि त्यांच्या बायकोशी त्यांना बोलता आलं नाही म्हणून ते रागावले होते. त्या दिवशी कळलं की बायकोवर त्यांचं किती प्रेम आहे आणि तिला ते किती मिस करतात.’
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी यांनी मालिकेतील त्यांचे बाबा म्हणजेच आप्पांसोबतचं नातं अधोरेखित करणाऱ्या पोस्ट मध्ये पुढे लिहिले आहे की, ‘आई कुठे काय करते मालिकेत आप्पा आणि अनिरुद्ध देशमुख जवळजवळ दीड वर्ष मनातल्या भावनांशी खेळत आहेत. अनिरुद्धचा आप्पांवर खूप जीव आहे. खऱ्या आयुष्यातही आप्पांची भूमिका साकारणाऱ्या किशोर महाबोले यांच्यावर माझा खूप जीव आहे. त्यांच्याविषयी प्रचंड आदर आणि खूप प्रेम आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. असंख्य कविता त्यांच्या मुखोद्गत आहेत. व. पु. काळेंचं साहित्य तर त्यांचं तोंडपाठ आहे. मोठमोठे डायलॉग त्यांचे असे पाठ असतात. अतिशय बुद्धिमान, मेहनती आणि हसमुख आप्पांशिवाय सेटवर कोणालाच करमत नाही. आप्पा हे पात्र सगळ्यांनाच आवडतं.’
मिलिंद गवळी पुढे लिखितात, ‘किशोरजींना एकुलती एक मुलगी आहे तिच्यावर ते छोट्या छोट्या गोष्टींसाठी अवलंबून असतात, ती म्हणेल तसं ते करतात. कोरोनाच्या कठीण काळामध्ये आम्ही एकत्रच शूटिंग करत आहोत. खूप धैर्याने आणि शांतपणे आम्हाला सगळ्यांना आधार देत ते त्यांचं काम चोख बजावत आहेत. काही आठवड्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झालं. जेव्हा ही बातमी त्यांना कळली तेव्हा आमचा एक मिश्किल असा सीन सुरू होता. वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून ते हादरून गेले. आमचे दिग्दर्शक रवी करमरकर यांनी आप्पांना ताबडतोब सोलापूरला निघायला सांगितलं. मात्र आप्पा म्हणाले सीन पूर्ण करुनच निघतो. तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून कधीही जाणार नाही. त्यांच्यातला बापमाणूस मी त्यादिवशी अनुभवला.’
‘आई कुठे काय करते’ ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी स्टार प्रवाहवर प्रसारित होते.
हेही वाचा - राजधानी दिल्लीत सर्व सुविधायुक्त १०० खाटांचे रुग्णालय बांधतेय हुमा कुरेशी!