मराठी डान्सिंग रियालिटी शो ‘मी होणार सुपरस्टार’ लवकरच स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याचे प्रोमोज प्रेक्षकांना आवडताहेत आणि एकंदरीतच या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता वाढली आहे. नुकताच मुंबईची शान असलेल्या दादर येथील प्लाझा थिएटर येथे अनोख्या डान्सिंग होर्डिंगचा लॉन्च सोहळा पार पडला. सुपरजज अंकुश चौधरीच्या हस्ते जल्लोषात या डान्सिंग होर्डिंगचं अनावरण करण्यात आलं. याप्रसंगी ‘मी होणार सुपरस्टार’ कार्यक्रमातील लायन्स ग्रुप आणि मायनस थ्री हे दोन ग्रुप्स देखील उपस्थित होते. या दोन्ही ग्रुप्ससोबत ठेका धरत अंकुशने या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
डान्सिंग होर्डिंगचा हा अनोखा प्रयोग पहिल्यांदाच मी होणार सुपरस्टार कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी करण्यात आला आहे. या अनोख्या उपक्रमाचं अंकुश चौधरी यांनी कौतुक केलं. स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. जबरदस्त परफॉर्मन्स सादर करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले स्पर्धक, नृत्यदिग्दर्शनाची उत्त्तम जाण असलेले कृती महेश आणि वैभव घुगेसारखे कॅप्टन्स, संस्कृती बालगुडेचं खुमासदार सूत्रसंचालन आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार अर्थातच अंकुश चौधरीचं मोलाचं मार्गदर्शन यामुळे या कार्यक्रमाची रंगत द्विगुणीत होणार आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईतल्या दादर येथील प्लाझा थिएटर येथे ‘मी होणार सुपरस्टार’ चं डान्सिंग होर्डिंग दिमाखात झळकलं.
या स्पर्धकांचं सुपरस्टार होण्याचं स्वप्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. प्लाझा येथे झळकलेलं हे डान्सिंग होर्डिंग म्हणजे याच स्वप्नपूर्तीच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे अशी भावना सुपरजज अंकुश चौधरी यांनी व्यक्त केली. ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमात महाराष्ट्रभरातले एकापेक्षा एक स्पर्धक आपलं टॅलेंट या मंचावर दाखवणार आहेत. ग्रुप डान्स, सोलो डान्स, ड्युएट असे नृत्याचे अनोखे प्रकार या मंचावर पाहायला मिळतील.
‘मी होणार सुपरस्टार’ हा नवीन डान्स रियालिटी शो २१ ऑगस्टपासून स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.
हेही वाचा - दिग्दर्शक मधुर भांडाकरने घेतली नीरज चोप्रा आणि मीराबाई चानूची भेट, बायोपिकच्या चर्चेला उधाण