मुंबई - सध्या कॉरोनच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु असताना, प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या मालिकांचं चित्रीकरण मात्र सुरूच आहे. सध्या आंब्याचा सिझन सुरु आहे. कोरोना असला तरी आपला आवडता आंबा आणि आमरसचा आस्वाद घेणे कुणीही थांबवलं नाहीये. अनेक कलाकार डायट कॉन्शियस असले तरी आंबा म्हटलं की डायट-बायट सर्व विसरून जातात. ‘माझा होशील ना’ च्या टीमच्या कलाकारांनीसुद्धा हेच केलं जेव्हा त्यांच्या समोर आमरस आला.
आमरसाच्या सोबत तिखट मिसळ
खरंतर आंब्याचा हंगाम सरण्याआधी ‘माझा होशील ना'च्या टीमला आमरस पार्टी करायचीच होती. गोड आमरसाच्या सोबत तिखट मिसळ असे अनोखे कॉम्बिनेशन म्हणजे मेजवानीच. अशीच आमरस-मिसळ मेजवानी झोडली ‘माझा होशील ना’ च्या संपूर्ण युनिटने.
आमरसचा मनमुराद आस्वाद
नुकतंच या मालिकेच्या सेटवर संपूर्ण टीमने आमरस पार्टी केली. घरापासून दूर असल्यामुळे मनसोक्त आंबे खाण्याची संधी हुकली असं होऊ नये म्हणून सेटवरच या टीमने आमरसचा मनमुराद आस्वाद घेतला. सेटवर आमरसाचा बेत असल्यामुळे सर्वांच्या तोंडाला पाणी तर सुटलंचं पण जिभेवरचा ताबा देखील सुटला आणि संपूर्ण टीमने काही मिनिटातच या आमरसाचा फडशा पाडला.
सध्या शूटिंग सिल्व्हासामध्ये
झी मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका 'माझा होशील ना'चं शूटिंग सध्या सिल्व्हासामध्ये चालू आहे. जवळपास एक महिन्याच्यावर हे सर्व कलाकार आपल्या कुटुंबापासून दूर राहून तिकडे चित्रीकरण करत आहेत. जरी कुटुंबापासून दूर असले तरी मालिकेतील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ कुटुंबाप्रमाणेच एकमेकांची काळजी घेत आहे. आणि तितकीच धमाल देखील करत आहेत. त्यामुळेच त्यांची आमरस-मिसळ पार्टी जोरात रंगली.