पुणे - मराठी भाषेच्या साहित्याचा आवाका आणखी वाढावा तसेच, मराठी भाषेची समृद्धी व्हावी यादृष्टीने विश्व स्तरावर मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. पुण्यातील शिवसंघ प्रतिष्ठानच्या सहकार्याने विश्वमराठी परिषद मागील ८ वर्षांपासून हे साहित्य संमेलन आयोजित करत आहे. यावर्षीचे हे ९ वे मराठी साहित्य संमेल्लन राहणार आहे. यावर्षी कंबोडिया येथे हे संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी स्थापत्य शास्त्रातील ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर गो. ब. देगलूरकर यांची निवड करण्यात आली आहे.
कंबोडियामधील अंकोरवाट येथे हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. विश्व मराठी परिषदेच्या वतीने आतापर्यंत अंदमान, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि इंडोनेशिया येथील बाली, तसेच दुबई या ठिकाणी संमेलन भरलेली आहे. प्रत्येक वेळी संमेलन आयोजित करत असताना मराठी साहित्या सोबतच विविध विषयातील मान्यवरांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देऊन त्याविषयाची माहिती मराठी मध्ये कशाप्रकारे प्रभावी पणे मांडता येईल या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जातात. या वर्षी हा मान डॉक्टर देगलूरकर यांना मिळाला आहे.
कंबोडिया येथे संमेलन आयोजित करण्याचे प्रमुख कारण म्हणजे येथील अंगकोर वाट हे मंदिर. स्थापत्यशास्त्राचा अद्भुत अविष्कार हे मंदिर मानले जाते. शेकडो एकर जागेत हिंदू राजा सूर्यवर्मन याने हे मंदिर बांधले होते. त्यामुळे या संमेलनाच्या निमित्ताने कंबोडियातील पर्यटन स्थळे, तिथली संस्कृती जवळून पाहण्याची संधी मिळणार असल्याचं संमेलनाचे कार्याध्यक्ष निलेश गायकवाड यांनी सांगितले.
२८ ऑगस्ट रोजी या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे यावेळी उद्घाटन करतील. तर, प्रमुख म्हणून विश्वास मेंहेंदळे हे असणार आहेत.