मुंबई - सरत्या वर्षाला अलविदा म्हणत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी मराठी कलाकार दरवर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला 'चिरायू' या संकल्पनेअंतर्गत खास पार्टीचं आयोजन करतात. यावर्षी महालक्ष्मी रेसकोर्सवर ही पार्टी आयोजित करण्यात आली. यावेळी अनेक कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली. अभिनेता सुशांत शेलारच्या 'शेलारमामा फाउंडेशन' तर्फे यंदा या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
दिवंगत अभिनेते-दिग्दर्शक विनय आपटे आणि गीतकार मंगेश कुलकर्णी यांनी 13 वर्षांपूर्वी चिरायू ही संकल्पना सुरू केली. त्यानंतर अनेक ठिकाणी या पार्टी पार पडू लागल्या. यंदाच्या पार्टीत खास मराठी प्रॉप्स घालून फोटोसेशन करण्याची सोय रेड कार्पेटवर करुन देण्यात आली होती. त्याचा सर्वच सेलिब्रिटींनी मनसोक्त आनंद लुटला. यावेळी रंगभूमी, सिनेमा आणि मालिका या क्षेत्रातील पडद्यामागे काम करणारे तंत्रज्ञ कामगार यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मान्यवर कलाकारांनी शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला.
श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, उषा नाडकर्णी, जयवंत वाडकर, विजय कदम, सुकन्या कुलकर्णी, तुषार दळवी, आभिज्ञ भावे, पल्लवी वैद्य, मनीषा केलकर, स्मिता गोंदकर, सिद्धार्थ जाधव, सोनाली खरे, मेघा धाडे, अदिती सारंगधर, नेहा शितोळे, वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे विज, पियुष रानडे, मंदार चोळकर, अवधूत गुप्ते, अमृता संत, अजित परब, मंदार चोळकर, अवधूत वाडकर अशा अनेक कलाकारांनी यावेळी उपस्थित राहून एकमेकांना आणि चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.