मुंबई - चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लेखक दिग्दर्शक मकरंद माने, अभिनेता शशांक शेंडे आणि अभिनेता शंतनू गंगणे यांनी बहुरुपी 'मंच स्टेज अँड स्क्रीन अॅकॅडमी'ची स्थापना केली आहे. लेखन, अभिनयासह रंगमंच आणि स्क्रीनच्या विविध अंगांबाबतचे परिपूर्ण मार्गदर्शन या संस्थेच्या माध्यमातून केले जाणार आहे. अभिनेता अमेय वाघ यांच्या हस्ते नुकतेच या अॅकॅडमीचे उद्घाटन झाले.
रंगभूमी, टीव्ही मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजच्या क्षेत्रात अलीकडे अनेक संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. मात्र, या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना आणि स्थिरावू पाहणाऱ्यांना अनेकदा नेमकी माहिती, संधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे तरुणांना दीर्घकाळ संघर्ष करावा लागतो. तसेच अनेक निर्माते, दिग्दर्शकही चांगल्या कलाकारांच्या शोधात असतात. त्यामुळे त्यांना चांगले कलाकार मिळवून देण्याचे कामही बहुरुपी मंच करणार आहे.
हेही वाचा -'चोरीचा मामला' सिनेमासाठी कलाकारांनी का सांडलं रक्त, त्या बंगल्यात नक्की घडलं काय..?
'रिंगण' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला लेखक दिग्दर्शक मकरंद माने, अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलेले अभिनेते शशांक शेंडे, टीव्ही मालिका, चित्रपटांमध्ये अभिनयासह कार्यकारी निर्मितीचाही अनुभव असलेल्या शंतनू गंगणे यांनी या अॅकॅडमीची स्थापना केली आहे. शशांक शेंडे यांनी अलिकडेच 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटात 'शेलारमामा'ची भूमिका साकारली आहे.
रंगभूमी, टीव्ही, चित्रपट, वेब क्षेत्रातील आपल्या अनुभवाचा फायदा तरुणांना करून देण्यासाठी या बहुरुपी मंचची स्थापना केली आहे.
अभिनयाच्या कोर्सने फेब्रुवारीमध्ये अॅकॅडमी सुरू होणार आहे. त्यात लहान मुले, अभिनय करू इच्छिणारे सर्वजण, तसेच स्क्रीनसाठीच्या अभिनयाचा अॅडव्हान्स्ड कोर्स असेल. तसेच येत्या काळात शास्त्रीय नृत्य, संगीत, देहबोली, वाचिक अभिनय, साउंड डिझाइन, व्हिडिओ प्रॉडक्शन्स, स्टील फोटोग्राफी, संहिता लेखन, असे विविध अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.
हेही वाचा -तान्हाजी अखेर महाराष्ट्रात टॅक्स-फ्री
'आजच्या घडीला रंगमंच आणि स्क्रीनच्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र, काहीवेळा गुणवत्ता असलेले कलाकार मिळत नाहीत किंवा संधी कशी मिळवायची याची माहिती कलाकारांना मिळत नाही. ही दरी दूर करण्याचा प्रयत्न या अॅकॅडमीद्वारे केला जाईल. तसेच कास्टिंग कंपनी म्हणूनही ही अॅकॅडमी काम करणार आहे. त्यामुळे निर्माता दिग्दर्शकांना त्यांच्या चित्रपटांसाठी सुयोग्य कलाकारांचा शोध घेणे सोपे जाईल,' असे मकरंद माने यांनी सांगितले.
हेही वाचा -'शहीद भाई कोतवाल' सिनेमात 'हा' अभिनेता दिसणार शहीद गोमाजी पाटलांच्या भूमिकेत