मुंबई - हिंदी सिनेसृष्टीतील ब्लॉकबस्टर चित्रपट 'शोले' चित्रपट आजतागायत हिट मानला जातो. या चित्रपटातील 'सांभा' हे पात्र तर सर्वांच्या स्मरणात असेलच. 'गब्बल'च्या तोंडी असलेल्या 'अरे वो सांभा कितने आदमी थे' या संवादाने प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. हे 'सांभा'चे पात्र साकारणाऱ्या मॅक मोहन यांच्या दोन मुली आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
होय, मॅक मोहन यांच्या दोन मुली मंझरी आणि विनती या दोघीही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव 'डेजर्ट डॉल्फिन' हे असणार आहे. या चित्रपटाची कथा स्केटिंगवर आधारित राहणार आहे.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी मंजरी १२ वर्षापासून लघूकथांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत आहे. तिने बऱ्याच प्रेरणादायी कथा प्रेक्षकांच्या समोर मांडल्या आहेत. यांच्यासोबत मंजरीने 'डंकर्क', 'द डार्क नाइट राइजेस' आणि 'वंडर वूमेन' आदी चित्रपटांसाठी काम केले. याशिवाय टॉम क्रूजच्या 'मिशन इम्पॉसिबल गोस्ट प्रोटोकॉल, 'वेक अप सिड' आणि विशाल भारद्वाज यांच्या 'सात खून माफ' या चित्रपटातही तिचे योगदान आहे.
३ शॉर्ट फिल्म्सचे दिग्दर्शन केल्यानंतर मंजरी आता आपल्या बहीणीसोबत म्हणजेच विनतीसोबत बॉलिवूडमध्ये तिचा पहिला चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. तर, विनती या चित्रपटाची निर्मिती करत आहे.