मुंबई - बॉलिवूडमधील ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे काल (१९ ऑगस्ट) रात्री निधन झाले. आज (२० ऑगस्ट) त्यांच्यावर शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांना जुहूतील दफनभूमीत दफन करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक मंडळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आवर्जून उपस्थित होती.
यात प्रामुख्याने ज्येष्ठ गीतकार गुलजार, गीतकार जावेद अख्तर, गजल गायक तलत अजिझ, दिग्दर्शक विशाल भारद्वाज, दिग्दर्शक अशोक पंडित, गायिका अलका याज्ञिक यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या जुहूतील निवासस्थानी हजेरी लावली. याशिवाय बिग बी अमिताभ बच्चन, दिग्दर्शक मधुर भांडारकर, अभिनेता अनुपम खेर, अभिनेत्री शबाना आझमी, यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
वयाच्या ९२ व्या वर्षी खय्याम यांनी अखेरचा श्वास घेतला. फुफ्फुसातील जंतुसंसर्गामुळे त्यांच्यावर सुजॉय रूग्णालयात उपचार सुरू होते. आपल्या करिअरमध्ये एकाहून एक सरस गाणी देणारे संगीतकार, अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या जाण्याने एक साधा पण सच्चा सूर आपल्यातून निघून गेल्याची भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.