जालना - नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या धरणामुळे सुमारे अडीच लाख लोक विस्थापित झाले. त्यांची गावे, घरेदारे, पाण्यात बुडाली. यातील सुमारे ३२ हजार कुटुंबांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. हे लोक जगतात कसे? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न दिग्दर्शिका शिल्पा बल्लाळ यांनी केलाय. जालना येथे त्यांच्या 'लकीर के इस तरफ' या लघुपटाचे खास स्क्रिनिंग करण्यात आले होते.
नर्मदा आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी ज्या पोटतिडकीने हे आंदोलन चालवले आणि त्याची फलश्रुती काय झाली? हे वास्तव दाखविण्याचा प्रयत्न शिल्पा बल्लाळ यांनी दिग्दर्शित केलेल्या 'लकीर के इस तरफ' या लघु चित्रपटातून दाखविण्याचा प्रयत्न केला.
येथील जीएस महाविद्यालयात मध्यवर्ती सभागृहात 90 मिनिटांचा हा लघुपट सर्वांसाठी दाखविण्यात आला. गुजरातमधील 1 हजार 312 किलोमीटरची लांबी असलेल्या नर्मदा नदीच्या तीरावर असलेल्या आदिवासी बांधवांची झालेली फरपट आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मेधा पाटकर यांनी 35 वर्षापासून दिलेला लढा, या लढ्यातून या आदिवासी बांधवांना काय मिळाले? आणि त्यांची काय प्रगती झाली? हा सर्व प्रवास या लघुपटाच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न केला गेला.
या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला डॉ. संजीवनी तडेगावकर, डॉ. यशवंत सोनूने, डॉ. महावीर सदावर्ते, प्रतिभा श्रीपत, प्रा. आनंद कुलकर्णी, प्राध्यापिका अग्निहोत्री, डॉ. हेमंत वर्मा आदींची उपस्थिती होती.