जालना - 'आवड तिथे सवड', अशी एक म्हण मराठीत रुजली आहे. ही म्हण एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने खऱ्या आयुष्यात उतरवली आहे. जालन्यातील दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक असलेल्या पल्लवी जाधव यांना अभिनयाची संधी मिळाली आहे. पुणे येथील क्षितिज प्रोडक्शन अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य महाआरतीचे चित्रिकरण करण्यात आले आहे. यामध्ये पल्लवी जाधव यांना मुख्य भूमिका मिळाली आहे. विशेष म्हणजे पोलीस प्रशासनातील काही कलाकरांनीच ही आरती गायली आहे.
पल्लवी जाधव यांना आत्तापर्यंत मॅडम, लेडी सिंघम, दामिनी, कोयत्या वाल्याची पोर या नावाने ओळखले जात होते. आता त्या एका अभिनेत्रीच्या रुपात सर्वांसमोर येणार आहेत.
गीतकार विश्वास राजे थोरात यांनी लिहिलेल्या या महाआरतीचे चतुर्श्रुंगी मंदिराच्या प्रांगणात सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आनंद डावरे, यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. ११ फेब्रुवारी रोजी ही आरती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोलीस प्रशासनातील बहुतांशी कलाकार या आरतीमध्ये आहेत.
![Jalana PSI Pallavi Jadhav to play role in Mahaaarti of King Shivaji](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-jal-03-psijadhv-story-avb_06022020134709_0602f_1580977029_971.jpg)
गरीब आणि कष्टकरी परिवारात ग्रामीण भागात जन्मलेल्या पल्लवी जाधव यांना अभिनय क्षेत्राची पहिल्यापासूनच आवड होती. त्यामुळे खाकी वर्दी सांभाळत अंगातील कला गुणांना त्यांनी वाव दिला. आपल्या कलागुणांना कुठे संधी मिळते का याचा शोध घेत असतानाच पोलिसांचा विशेष सहभाग असलेल्या या आरतीमध्ये त्यांना प्रमुख भूमिका मिळाली.
![Jalana PSI Pallavi Jadhav to play role in Mahaaarti of King Shivaji](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-jal-03-psijadhv-story-avb_06022020134709_0602f_1580977029_493.jpg)
दामिनी पथकाच्या प्रमुख असल्यामुळे पल्लवी जाधव या नेहमीच चर्चेत असतात. रोड रोमिओची धुलाई हा त्यांचा आवडता विषय. त्याच सोबत महाविद्यालयीन तरुणींना स्वसंरक्षणाचे धडे देऊन उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यातही त्या अग्रेसर असतात.