मुंबई - इंडियन आयडॉलच्या ११ व्या सिझनमध्ये अनु मलिक यांची जागा गायक हिमेश रेशमिया घेणार आहेत. अनु मलिकवर झालेल्या मीटू मोहिमे अंतर्गत आरोपानंतर शो सोडावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या जागी कोण परिक्षक म्हणून बसणार याची चर्चा रंगली होती. त्याला आता विराम देण्यात आला आहे.
काही महिन्यापूर्वी गायिका सोना मोहापात्रा हिने अनु मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर गायिका नेहा भसीन आणि श्वेता पंडित यांनीही मलिक यांच्यावर असेच आरोप केले होते. त्यामुळे शोच्या निर्मात्यांवर समाज माध्यमातून दबाव येत होता. म्हणूनच या शोमधून मलिक यांना बाहेर काढण्यात आले आहे. आता त्यांच्या जागी हिमेश रेशमियांची वर्णी लागली आहे.
शोमध्ये सहभागी होताना हिमेश म्हणाला, ''मी सुपरस्टार सिंगरचा भाग राहिलो आहे. आता माझा प्रवास इंडियन ऑयडॉलच्या ११ व्या पर्वात सुरू होत आहे. हा केवळ भारतात दीर्घ चालणारा शो नाही तर तो आयकॉनिक आहे. मी परिक्षक पॅनेलचा भाग बनल्यामुळे आनंदीत झालो आहे. इथून पुढे माझी जबाबदारी वाढत आहे. मी या शोला सुरूवातीपासून फॉलो करीत असून या सिझनमध्ये उमदे गायक पुढे येत आहेत, ज्यांच्यात इंडियन म्यूझिक इंडस्ट्री बदलण्याची क्षमता आहे, असे मला वाटते.''
गेल्या वर्षी इंडियन आयडॉलच्या १० पर्वातून याच कारणासाठी अनु मलिक यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र ११ व्या सिझनमध्ये त्यांना परत बोलवण्यात आले होते. त्यानंतर आरोप करणाऱ्या गायिकांनी याला जबरदस्त आक्षेप घेत सोशल मीडियावर मोहिम चालवली होती. याचा फटका त्यांना पुन्हा बसला आहे.