मुंबई - अभिनेत्री स्पृहा जोशीचा आज वाढदिवस. स्पृहाचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. कवियत्री, सूत्रसंचालिका आणि अभिनेत्री स्पृहा जोशी मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहे. मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधून ती प्रसिद्ध झाली. ‘मायबाप’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून झळकलेली स्पृहा नंतर ‘सूर राहू दे’ मधून नायिकेच्या भूमिकेत दिसली. बालमोहन विद्यामंदिर आणि रुईया कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलेली स्पृहा पक्की दादरकर-मुंबईकर आहे.
![Happy Birthday Spruha Joshi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-actor-spruha-joshi-happy-birthday-mhc10001_13102021015214_1310f_1634070134_558.jpeg)
कॉलेजात नाटकांमधून काम करीत असताना पुढे याच क्षेत्रात करियर करण्याचा तिचा विचार पक्का झाला होता. तिने अनेक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा गाजविल्या आहेत. स्पृहा ने ‘अनन्या’ नावाच्या एकांकिकेत काम केले होते आणि अभिनयाचा प्रथम पुरस्कार मिळविला होता. रंगभूमीवर दोन्ही हात कापले गेलेल्या मुलीची जगण्याची जिद्द तिने अप्रतिमपणे साकारली होती. पुढे या एकांकिकेचे नाटकात रूपांतर झाले आणि त्यात अनन्याची भूमिका अभिनेत्री ऋतुजा बागवेने साकारली होती. ऋतुजाला त्यातील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनयाचे डझनभर पुरस्कार मिळाले आहेत. आता याच कलाकृतीवर हृता दुर्गुळे अभिनित ‘अनन्या’ नावाचा चित्रपट येतोय. जो प्रदर्शनासाठी सज्ज आहे. थोडक्यात स्पृहा ने ‘अनन्या’ मध्ये अप्रतिम अभिनयाचा मापदंड प्रस्थापित केला होता. त्यामुळे इतर अभिनेत्रींना त्याचा फायदा नक्कीच झाला.
![Happy Birthday Spruha Joshi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-actor-spruha-joshi-happy-birthday-mhc10001_13102021015214_1310f_1634070134_450.jpeg)
स्पृहा जोशी कवितांमध्ये रमते. तिने तिच्या कवितांचा संग्रह ‘लोपामुद्रा’ मधून एकत्रित केला आहे. याआधी तिच्या कविता ‘चांदणचुरा’ या पुस्तकातून प्रकाशित झाल्या होत्या. तसेच तिने सिनेमांसाठीसुद्धा गीतकार म्हणून काम केलंय. ‘बावरे प्रेम हे’ आणि ‘लॉस्ट अँड फाउंड’ या मराठी चित्रपटांत तिची गाणी होती. स्पृहाचे कविता लेखन सुरूच असते आणि तिची खासियत म्हणजे तिच्या कवितांमधील भाषासौंदर्य. ओघवत्या शैलीत लिहिलेल्या तिच्या कविता क्लिष्ट वाटत नाहीत हेच तिच्या लिखाणाचे यश म्हणावे लागेल.
![Happy Birthday Spruha Joshi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-actor-spruha-joshi-happy-birthday-mhc10001_13102021015214_1310f_1634070134_186.jpeg)
स्पृहा जोशी ने ‘लहानपण देगा देवा’, ‘नांदी’, ‘समुद्र’, ‘डोन्ट वरी बी हॅपी’ सारख्या नाटकांतून विविधांगी भूमिका केल्या. ‘समुद्र’ मध्ये चिन्मय मांडलेकर आणि ‘डोन्ट वरी बी हॅपी’ मध्ये उमेश कामत सोबत तिची अभिनय-जुगलबंदी खूपच गाजली होती. ‘अग्निहोत्र’ या मालिकेतून स्पृहा प्रेक्षकांच्या ओळखीची तर ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ आणि ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ मधून मराठी प्रेक्षकांची लाडकी झाली. अभिनयाबरोबरच स्पृहा उत्तम सूत्रसंचालिका आहे आणि ‘सूर नवा ध्यास नवा’ च्या सर्व पर्वांच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ती योग्यपणे पार पाडत आहे. एका छोट्यांच्या पर्वातील अत्यंत लाघवी ‘मॉनिटर’ हर्षद नायबळ सोबत तिची केमिस्ट्री लाजवाब होती आणि आजही त्या दोघांचे व्हिडीओज इंटरनेटवर मोठ्या संख्येने पाहिले जातात.
![Happy Birthday Spruha Joshi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-actor-spruha-joshi-happy-birthday-mhc10001_13102021015214_1310f_1634070134_1047.jpeg)
‘लॉस्ट अँड फाउंड’, ‘पैसा पैसा’, ‘देवा’, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’, ‘विकी वेलिंगकर’ सारख्या अनेक चित्रपटांतून स्पृहा जोशीने निरनिराळ्या भूमिका केल्या ज्या प्रेक्षकांना पसंतही पडल्या. ‘अटकन चटकन’ सारखी हिंदी फिल्म असो वा ‘रंगबाज फिरसे’ सारखी हिंदी वेब सिरीज असो, स्पृहा ने यातही आपली निराळी छाप सोडलेली दिसते. आता वरद लघाटे सोबत स्पृहाचा संसार उत्तम रीतीने सुरु असून तिचे काही नवीन सिनेमे येणार आहेत. ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघताहेत. चतुरस्त्र अभिनेत्री स्पृहा जोशीला ईटीव्ही भारत मराठीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हेही वाचा - child covid vaccination लहान मुलांसाठीच्या या २ व्हॅक्सिनला मंजुरी, या २ व्हॅक्सिनच्या ट्रायल सुरु