बहुतेक बऱ्याच मालिकांमध्ये साध्या दिसणाऱ्या नायक किंवा नायिकेचा ग्लॅमरस मेकओव्हर करून कथानक इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न केला जात आला आहे. हिंदी असो वा मराठी मालिका, त्यातील मेकओव्हर प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजक वाटतो. स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील गौरीला आतापर्यंत आपण साडीमध्ये पाहत आलोय. पण लवकरच मालिकेत गौरीचा मॉडर्न अंदाज पाहायला मिळणार आहे.
जयदीपच्या मित्रमंडळींनी आयोजित केलेल्या एका खास पार्टीसाठी गौरीने मेकओव्हर केलाय. पार्टी गाऊन मधला गौरीचा अंदाज पाहून जयदीपच्या मनात तर ‘परी म्हणू की अप्सरा’ ही एकच भावना आहे. या पार्टीसाठीची सगळी तयारी जयदीपनेच केलीय. पार्टीमध्ये काय घालायचं, कसं वावरायचं या सगळ्या टिप्स जयदीपने गौरीला दिल्या आहेत.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षक-प्रिय झालीय. याचे कथानक प्रेक्षकांना आवडत असून प्रत्येक कलाकाराचा अभिनय आणि मालिकेचं सादरीकरण व मांडणी सर्वांनाच भावत आहे. गौरीची भूमिका साकारणारी गिरीजा स्वतःला या नव्या रुपात पाहून फारच भारावून गेलीय. संपूर्ण टीमने मिळून तिचा हा लूक डिझाईन केला आहे. हा सीन करताना सेटवरही नवा उत्साह संचारला होता. जयदीप गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं आहे. हेच प्रेम मालिकेतल्या या नव्या वळणाला सुद्धा मिळेल हीच आशा सर्वजण करीत आहेत.
गिरीजाचा म्हणजेच गौरीचा हा हटके अंदाज पुढील आठवड्यात ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत पाहावयास मिळेल, जी प्रसारित होते स्टार प्रवाह वाहिनीवर.
हेही वाचा - नागपूरहून हैदराबादला एअरलिफ्ट केलेल्या भारतीचे निधन, सोनूने वाहिली श्रध्दांजली