मुंबई - कोरोनाने उसंत घेतल्यामुळे मनोरंजनसृष्टीत आनंद पसरला आहे. नवीन चित्रपट बनले जात असून नवीन मालिकाही छोट्या पडद्यावर येत आहेत. कोरोना काळात छोट्या पडद्यापासून दूर गेलेला प्रेक्षकवर्ग पुन्हा टेलिव्हिजनकडे वळविण्यासाठी टीव्ही वाहिन्या बरेच प्रयत्न करताना दिसत आहेत. अनेक मालिकांमधून मराठी चित्रपटांमधील स्टारमंडळी प्रेक्षकांना मनोरंजित करताना दिसत आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता सचित पाटीलचे टेलिव्हिजनवर धमाकेदार पुनरागमन होत आहे, ‘अबोली’ या नवीन मालिकेतून. त्याला साथ मिळणार आहे प्रसिद्ध अभिनेत्री गौरी कुलकर्णीची जी त्या मालिकेत साकारणार आहे, ‘अबोली’.
मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतेय नवी मालिका अबोली. मालिकेच्या शीर्षकाप्रमाणेच ही गोष्ट आहे अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची. अभिनेत्री गौरी कुलकर्णी अबोली ही व्यक्तिरेखा साकारणार असून गौरी ही भूमिका साकारण्यासाठी खुपच उत्सुक आहे. ‘अबोली’ मालिकेत गौरी कुलकर्णी सोबत आहे सचित पाटील, प्रतिक्षा लोणकर, मौसमी तोंडवळकर, शर्मिष्ठा राऊत, संदेश जाधव, अपर्णा अपराजित, अंगद म्हस्कर, दीप्ती लेले, अशी दमदार कलाकारांची फौज आहे.
या भूमिकेविषयी सांगताना गौरी म्हणाली, ‘अबोली ही अतिशय साधी मुलगी आहे. नावाप्रमाणेच अबोल, कमी बोलणारी. तिचे असे वेगळे जग आहे ज्यात ती रमते. खरतर तिला तिचे म्हणणे मांडायचे असते. मात्र, तिला ते मांडू दिले जात नाही. माझ्यासाठी ही अतिशय आव्हानात्मक भूमिका आहे. कारण मला बोलायला खूप आवडतं. सेटवर माझी अखंड बडबड सुरू असते. अबोली मात्र मितभाषी आहे. त्यामुळे अबोली साकारणं माझ्यासाठी नवे आव्हान आहे. आमची टीम खूपच छान आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही ही मालिका पहाताना भरभरुन आनंद मिळेल याची खात्री आहे.’ नवी मालिका ‘अबोली’ स्टार प्रवाहवर वाहिनीवर मंगळवार 23 नोव्हेंबरपासून रात्री 10.30 वाजता प्रसारित होणार आहे.
हे ही वाचा - आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'झोंबिवली' प्रदर्शित होणार ‘या’ तारखेला!