मुंबई - तारक मेहता का उल्टा चश्मा या टीव्ही सिरीयल मधील अभिनेत्री मुनमुन दत्ता हिच्या विरोधात मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यामध्ये वाल्मीकी समाजाकडून देण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आंबोली पोलिसांनी मुनमुन दत्ताच्या विरोधात प्रिव्हेंशन ऑफ ॲट्रॉसिटी अॅक्ट 2015 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच हिच्या विरोधात देशातील इतर राज्यांमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
इंस्टाग्राम अकाउंटवरून जातिवाचक व्हिडिओ केला होता पोस्ट
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक जातिवाचक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये मुनमुन दत्ता हिने केलेले वक्तव्य हे वादग्रस्त ठरल्याने, वाल्मिकी समाजाकडून तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
'मुनमुन दत्ता विरोधात कायदेशीर कारवाई होणे आवश्यक'
वाल्मीकी समाजाचे प्रवक्ते रेशपाल मोहित यांच्या म्हणण्यानुसार, टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्री मध्ये वाल्मीकी समाजाचे शेकडो नामांकित कलाकार आहेत. हे सर्व कलाकार दिसायला देखणे सुद्धा आहेत. त्यामुळे मुनमुन दत्ता हिने सरसकट एका जातिविशेष समुदायाच्या लोकांना असे विद्रूप दाखवणे किंवा विद्रूप संबोधणे हे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. म्हणून मुनमुन दत्ता यांचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आणि जातीवाचक असून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - सलमानचे वडील सलीम खान म्हणाले, "'राधे' हा अजिबात उत्तम चित्रपट नाही"