मनुष्याप्रमाणेच प्राण्यांचीही एक जीवनशैली असते. त्यांनाही शिकारीच्या ‘कामावर’ जाऊन कुटुंबियांचे पॉट भरायचे असते. प्राण्यांमध्येही प्रेम, राग, लोभ, मत्सर इत्यादी सर्व प्रकारच्या भावना असतात आणि ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत त्यांना याची कल्पना असेलच. परंतु जंगलात राहणारे आपाळीव प्राणी आणि त्यांची जीवनशैली अभ्यासण्यासाठी छायाचित्रकार हेमंत सावंत यांनी अतीव मेहनत घेऊन वाघांची काही चित्र टिपली असून त्यातून व्याघ्र जीवनशैलीचं दर्शन घडते.
छायाचित्रकार हेमंत सावंत यांचे व्याघ्रजीवनशैलीवर आधारीत छायाचित्रांचं प्रदर्शन येत्या २३ नोव्हेंबर २०२१ पासून जहांगीर कलादालनात सुरू होत आहे. ते गेली अनेक वर्ष अनेक जंगलांतून भटकंती करीत होते. ‘जंगल टू जंगल’ असा प्रवास करीत त्यांनी कान्हा, बांधवगड, पन्हा, मेळघाट, ताडोबा, पेंच, रणथंबोर, जिम कॉर्बेट या जंगलांत जाऊन व्याघ्रजीवनशैलीचा अभ्यास केला आणि कॅमेऱ्यात महत्त्वाचे क्षण टिपले आहेत.
आनंदी व आळस देणारा वाघ, आक्रमक आणि चपळपणा असणारा वाघ, ऐटबाज चाल असणारा वाघ, मित्रांसोबत पाण्यातून धावत रममाण होणारा वाघ, आपल्या पिल्लांची काळजी घेणारी कुटुंबवत्सल वाघीण अशा अनेक गोष्टी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद आहेत. शिवाय त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी एका व्हिडिओची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या व्याघ्रप्रदर्शनात जवळपास ५० छायाचित्रे मांडण्यात येणार असून त्याचे उदघाटन वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड असणारे व ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी श्री. मुकुल वासनिक यांच्या हस्ते २३ नोव्हेंबरला सायं.५ वाजता होणार आहे. त्यावेळी फोटोग्राफी क्षेत्रातील जाणकार श्री केकूभाई कोठारी, तसेच माजी आरोग्य मंत्री व फोटोग्राफी अभ्यासक श्री सुरेश शेट्टी व शारी फोटोग्राफीचे संचालक गिरीश मिस्त्री देखील उपस्थित राहणार आहेत.
व्याघ्र जीवनशैलीचं दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन थेट जंगलात गेल्याचा अनुभव देईल म्हणून या व्याघ्रप्रदर्शनाचा आनंद लुटा असे फोटोग्राफर हेमंत सावंत यांनी सर्वांना आवाहन केले आहे. २३ ते २९ नोव्हेंबर २०२१, सकाळी ११ ते सायं. ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहणार आहे.