अकोला - विदर्भाच्या विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे डॅडी देशमुख यांच्या स्मृती निमित्त आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवाचे आयोजन 27 डिसेंबरला करण्यात आले आहे. या महोत्सवात विदेशातील लघु चित्रपट सहभागी झाले आहेत. प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित या महोत्सवात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि मराठी चित्रपट कलावंत उमेश कुळकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजक डॉ. राजेश देशमुख यांनी आज दिली.
या महोत्सवातून डॅडी देशमुख यांच्या कार्याला उजाळा देण्यात येणार आहे. या महोत्सवात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध भाषांमधील लघु चित्रपटांची मेजवानी अकोलेकर कला रसिकांना लाभणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या वर्षात अमेरिका, इंग्लंड, दुबई, दक्षिण आफ्रिका, पोर्तुगाल, पाकिस्तान, थायलंड आदी विदेशी लघु चित्रपटांसह भारतातील विविध राज्यांमधून पंजाबी, तेलगू, बंगाली, मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तामिळ अशा विविध भाषेमधील 165 लघु चित्रपटांचा सहभाग आहे, असेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला प्रा. तुकाराम बिडकर, प्रशांत देशमुख, विजय देशमुख, प्रा. संतोष हुशे, प्रा. सदाशिव शेळके हे उपस्थित होते.