‘ती परत आलीये’ या मालिकेतील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांची मन जिंकलीच पण त्याचसोबत मालिकेच्या कथानकाला पुरेपूर न्याय देखील दिला. या मालिकेने नुकतंच १०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला आहे आणि त्याच सोबत मालिका शेवटच्या आणि अतिशय रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. ‘ती परत आलीये’ असं म्हणत आख्ख्या महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवणारी ही मालिका सुरुवाती पासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली.
प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा पाहता या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेचं रहस्यमय कथानक आणि खिळवून ठेवणारे प्रसंग हे उल्लेखनीय असून प्रत्येक व्यक्तिरेखेचा अभिनय हा एकापेक्षा एक होता असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. मालिकेच्या सुरुवातीपासूनच ती परत आलीये म्हणजे ती नक्की कोण आहे या प्रश्नाने प्रेक्षकांना भंडावून सोडले. आता लवकरच मालिकेत 'ती'चा पर्दाफाश होणार असून या सगळ्यामागे नक्की कोण आहे हे प्रेक्षकांना कळेल. एकामागे एक चालू असलेल्या हत्येच्या मालिकेमागे नक्की ती आहे की तो याचं रहस्य उलगडणार असून संपूर्ण महाराष्ट्राला 'ती' कोण आहे? याच उत्तर मिळणार आहे. त्यामुळे हे रहस्य जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठा अजूनच वाढली आहे.
हेही वाचा - कभी खुशी कभी गमची 20 वर्षे : आलिया भट्टने केला करीना कपूरचा ‘K3 G’चा सीन पुन्हा रिक्रिएट