मुंबई - अभिनेता सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांचा 'भारत' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या ५ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला परवानगी मिळणे गरजेचे होते. सेन्सॉर बोर्डानेही या चित्रपटाला हिरवा झेंडा दाखवला आहे. विशेष म्हणजे सेन्सॉरने या चित्रपटात कोणताही कट सुचवला नाही.
बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांना प्रदर्शनापूर्वी सेन्सॉर बोर्डाकडून कट्स सुचवले जातात. मात्र, 'भारत' चित्रपटात कोणताही कट आवश्यक नसल्याने हा चित्रपट कटशिवाय पास झाला आहे. यावरून प्रदर्शनापूर्वीच 'भारत' चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकण्यास सुरुवात केली आहे, असे दिसते.
कॅटरिना आणि सलमान खान हे दिग्दर्शक अली अब्बास जफरसोबत तिसऱ्यांदा काम करत आहेत. सलमान आणि कॅटरिनाची जोडीदेखील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवर चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया आल्या आहेत. तसेच, यातील गाणीही हिट झाली आहेत. सध्या सलमान आणि कॅटरिना चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. प्रमोशन दरम्यान देखील त्यांची केमेस्ट्री पाहायला मिळते.
सुरुवातीला या चित्रपटात प्रियांका चोप्रा भूमिका साकारणार होती. मात्र, तिने चित्रपटातून माघार घेतल्यानंतर तिची भूमिका कॅटरिनाच्या वाट्याला आली. त्यामुळे ही भूमिका साकारणे आव्हानात्मक होते, असे कॅटरिनाने प्रमोशनदरम्यान सांगितले आहे. तर, प्रियांकामुळेच कॅटरिनाला तिच्या करिअरमधली सर्वोत्कृष्ट भूमिका साकारण्याची संधी मिळाली, असा टोला सलमानने प्रियांकाला लगावला आहे.
सलमान -कॅटरिनाची जोडी असलेला 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता 'भारत' चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.