मुंबई - 'बिग बॉस मराठी'चे चाहते ज्या दिवसाची मागील कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते, तो शो कालपासून म्हणजे २६ मे पासून सुरू झाला आहे. या शोचे दमदार ग्रँड प्रिमिअर झाले. यामध्ये कोणते स्पर्धक असणार याचाही उलगडा झालाय. महेश मांजरेकर मागच्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी या शोचे सुत्रसंचालन करणार आहेत.
मराठी कलाविश्वातील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच गाजणारा रिअॅलिटी शो म्हणजे 'बिग बॉस मराठी'. वादग्रस्त जरी असला तरीही या शोची लोकप्रियतादेखील मोठ्या प्रमाणात पाहायल मिळते. त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून या शोची उत्सुकता पाहायला मिळत होती.
'हे' असणार स्पर्धक -
मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे विज बिग बॉसची घरातील पहिली स्पर्धक ठरली आहे. किशोरी शहाणेला ७वा क्रमांक मिळाला आहे. या स्पर्धेचा दुसरा स्पर्धक मालवाणचे नायक दिगंबर नाईक आणि तिसरी स्पर्धक नेहा शितोळे ठरली आहे. त्यांच्यासोबतच सुरेखा पुणेकर, वैशाली भैसने माडे, अभिजीत बिचुकले, शेफ पराग कान्हेरे, अभिजीत केळकर, माधवी जुवेकर, रूपाली भोसले, माधव देवचक्के, विद्याधर जोशी, शिवानी सुर्वे, शिवा ठाकरे, वीणा जगताप, अशा १५ सेलिब्रिटींची बिग बॉसच्या घरात दिमाखदार एन्ट्री झाली आहे.
बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासूनच एकमेकांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. त्यामुळे १०० दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात आता काय घडणार, कोण बाजी मारणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.