ठाणे - ठाण्यातील घाणेकर नाट्यगृहामधील अडचणी काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. 'सही रे सही'च्या प्रयोगादरम्यान वातानुकूलिन यंत्रणा बंद असल्यामुळे अभिनेता भरत जाधवने फेसबुकवर पोस्ट टाकून याबाबत आपला निषेध नोंदवला आहे.
ठाण्यातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा घाणेकर नाट्यगृह मागील अनेक वर्षांपासून वादात सापडला आहे. बिल्डरने बांधकाम करून दिल्यानंतर नाट्यगृहाचे छत कोसळले होते. सुदैवाने त्यात कोणी जखमी झाले नव्हते. याची दुरुस्ती करायला अनेक महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर घाणेकर नाट्यगृहाची लिफ्ट बंद होऊन अनेक प्रेक्षक त्यात अडकले होते. घाणेकर नाट्यगृहाकडे होणारे प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून आता कलाकारांनी देखील सुविधांबाबत आवाज उठवणे सुरू केले आहे. त्यामुळे आता तरी प्रशासन याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न उभा राहिला आहे.