मुंबई - भाई म्हणजेच पु.लं. देशपांडे यांच्या बायोपिकचा उत्तरार्ध आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पु.लं.चं बालपण, त्यांचं तारुण्य, मनाला आनंद देईल असं वागणं, सुनीताबाईंच्या प्रेमात पडणं, अशा अनेक घटना या सिनेमाच्या पूर्वार्धात प्रेक्षकांनी पाहिल्या. मात्र पुलंच्या व्यक्तीमत्त्वाला पूर्णत्त्व देणाऱ्या अनेक घडामोडींचा कोलाज उत्तरार्धात उलगडलेला आपल्याला दिसणार आहे.
चित्रपटातील प्रसंग -
पु.लं.ची मृत्यूशी अखेरची झुंज सुरू असताना एकामागून एक असा हा प्रवास सुरू होतो. पुलंनी स्वीकारलेली दूरदर्शनची नोकरी, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचं केलेलं कौतुक, त्यानंतर तडकाफडकी दिलेला राजीनामा, पुढे बहुढंगी व्यक्तिमत्वावर आधारित बटाट्याची चाळ या नाटकाचा जन्म, त्याच्या प्रयोगांच्या ओघात आचार्य अत्रेंशी झालेली भेट, आनंदवनातून बाबा आमटेंचं आलेलं आमंत्रण आणि त्यांना पु.लं. आणि सुनीताबाईंनी सढळ हस्ते मदत करण्याचा घेतलेला निर्णय, मुक्तांगण संस्थेला केलेली मदत, असे अनेक प्रसंग एकामागून एक उलगडत जातात.
पु.लं.चा सामाजिक आणि वैचारिक दृष्टिकोन किती प्रगल्भ होता याचं दर्शन घडतं. पुलंची सामाजिक बांधिलकी जेवढी सजग होती तेवढेच राजकीय विचारही तीव्र होते हे आणीबाणीवेळी त्यांनी घेतलेल्या भूमिकेवरून स्पष्टपणे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून झालेला वाद असो किंवा जनता पक्षाच्या खासदाराला सुनावलेले खडे बोल असो या सर्वांतून त्यांच्या व्यक्तिमत्वातला बाणेदारपणा उठून दिसतो.
उत्तम संगीत -
संगीताची बाजू ही पायथ्यावर कळस चढवण्यात यशस्वी झाली आहे. यासाठी सिनेमाला संगीत देणाऱ्या अजित परब यांचं विशेष कौतुक करायला हवं. विशेष म्हणजे पूर्वार्धातील मैफिलींच्या प्रसंगावर आलेले आक्षेप पाहता उत्तरार्धात महेश मांजरेकर यांनी तशी कोणतीही चूक केलेली नाही.
कलाकारांच्या भूमिका -
सागर देशमुखने पु.लं.ची आणि इरावती हर्षे यांनी सुनीताबाईंची व्यक्तिरेखा समरसून केली आहे. अभिनयाच्या बाबतीत सगळ्याच सह कलाकारांनीही वाट्याला आलेली भूमिका उत्तम पद्धतीने साकारली आहे. मग अत्रेंच्या भूमिकेतील अभिजित चव्हाण असो किंवा मग विजय तेंडुलकरच्या भूमिकेतील विक्रम गायकवाड असो, बाबा आमटे आणि साधना आमटेंच्या भूमिकेतील संजय खापरे, मेघा मांजरेकर आणि बाळासाहेबांच्या भूमिकेतील श्रीरंग साठे सगळ्यांनी आपली भूमिका चोखपणे बजावली आहे.
सुरेख मांडणी -
पु.लं.सारख्या हरहुन्नरी व्यक्तीमत्त्वाला एका सिनेमात बसवणं हे जवळपास अशक्य. मात्र अशातही त्यांची एवढी सुरेख मांडणी केल्याबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर, लेखक रत्नाकर मतकरी आणि पटकथा लेखक गणेश मतकरी यांचेही विशेष कौतुक. थोडक्यात काय तर सुनीताबाईंच्या तोंडी असलेल्या संवादानुसार भाई हे कुठेही दूर गेलेले नसून त्यांच्या कलेच्या माध्यमातून ते आपल्यातच आहेत. रसिक प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा असा हा चित्रपट असून तो त्यांच्यासाठी नक्कीच मर्मबंधातली ठेव ठरेल एवढं नक्की.