कोलकाता - कोलकाता बुक फेअरच्या ठिकाणी चोरी करून लक्ष वळवल्याप्रकरणी अभिनेत्री रूपा दत्ताला अटक करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या रुपा दत्ताला शनिवारी एका पोलीस कर्मचाऱ्याने तिची पर्स डस्टबिनमध्ये फेकताना दिसल्यानंतर अटक करण्यात आली, असे नगर उत्तर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार रुपा दत्ता हिला ताब्यात घेऊन तिची चौकशी करण्यात आली आणि तिच्या जबाबात अनेक विरोधाभास आढळून आले. तपासादरम्यान अभिनेत्रीच्या पर्समधून अनेक पाकिटे आणि 75,000 रुपये रोख जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. "
'केपमारी' (लक्ष चुकवून चोरी करणे) च्या आरोपाखाली रुपा दत्ता हिला अटक करण्यात आली आहे आणि या गुन्ह्यात आणखी काही लोक सामील आहेत का याचा तपास सुरू आहे," असे अधिकाऱ्याने सांगितले.
चित्रपट निर्माता अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक छळाचे खोटे आरोप केल्यामुळे रुपा दत्ता याआधीही वादात सापडली आहे. तिने सोशल मीडियावर अनुराग नावाच्या दुसऱ्या व्यक्तीसोबत केलेल्या संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर केले होते.