मुंबई - अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे ही मराठी संगीतक्षेत्रातील दोन मोठी नावं पण अजूनपर्यंत त्यांना एकत्र काम करणं जमून येत नव्हतं. परंतु लॉकडाऊन काळात अनेक अनोख्या गोष्टी घडल्या त्यातील एक म्हणजे या दोन संगीत दिग्गजांचे एकत्र येणे. दोघे ‘हिरो सरपंच'साठी एकत्र आले आहेत. या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केले असून अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे यांनी स्वरबद्ध केले आहे. तर गाण्याला महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे यांनी शब्दबद्ध केले आहे. या गाण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सर्व आजी माजी सरपंच आणि उपसरपंच यांच्या या महान कार्याला एक सलाम असून यातून सत्कर्म करण्यासाठी प्रेरणा देण्याचाही हा एक प्रयत्न आहे.
अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे पहिल्यांदाच एकत्र 'हिरो सरपंच' नावाचे हे गाणे एक वेस्टर्न सॉन्ग असून 'आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी' असे या गाण्याचे बोल आहेत. चित्रपटातील हिरो हा एका काल्पनिक जीवनाचे प्रतीक आहे, तर गाव आणि गावाच्या विकासाचा खरा शिलेदार आणि खरा हिरो हा सरपंचच आहे. कोरोनाकाळात आरोग्यदूत असणाऱ्या सर्व आजी, माजी सरपंचाना, उपसरपंचाना हे वेस्टर्न सॉन्ग प्रथमच समर्पित करण्यात आले आहे. मागच्या वर्षी भारतासह संपूर्ण जगात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले होते. या महामारीच्या अति कठीण काळात अनेक लोकांनी स्वेच्छेने आरोग्यदूत म्हणून काम केले. यात लाखो आजी-माजी सरपंच आणि उपसरपंच यांचा समावेश होता. त्यांच्या कार्याला सन्मानित करण्यासाठी हे गाणे महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने तयार केले आहे. नुकताच या गाण्याचा अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय नामदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते मुंबईत संपन्न झाला.यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले, " सरपंच या पदामुळेच गावाचा विकास होतो. त्यामुळे सरपंच गावाचा विकास करताना देशाचा सुद्धा विकास होत असतो. त्याचा या देशाला पुढे नेण्यात खूप मोठा वाटा आहे हे विसरता येणार नाही. त्यांच्या या विकासपर्वाला आणि कोरोनाकाळातल्या कार्याला या गीताच्या माध्यमाने एक मानवंदना देण्याचा जो प्रयत्न झाला आहे, तो खरंच खूपच उल्लेखनीय आहे."संगीतकार अवधूत म्हणाला, " हे गाणं माझ्यासाठी खरंच खूप खास गाणं आहे. ह्या गाण्याला संगीत आणि आवाज देणे हे मी माझे भाग्यच समजतो. सरपंच आणि उपसरपंचाची भूमिका एका गावासाठी महत्वपूर्ण असते आणि हीच भूमिका या गाण्यातून अतिशय समर्पक शब्दात नवनाथ काकडे यांनी त्यांच्या लेखणीतून उतरवली आहे. हे गाणं आमच्या संपूर्ण टीमकडून महाराष्ट्रातल्या सर्व सरपंच आणि उपसरपंच यांना कृतज्ञतापूर्ण एक भेट आहे."गायक आदर्श शिंदे म्हणाला, "हे गाणं तर नक्कीच स्पेशल आहे, मात्र ह्या गाण्याच्या निमित्ताने अजून एक स्पेशल गोष्ट घडली आहे, ती म्हणजे मी आणि अवधूत गुप्ते पहिल्यांदाच सोबत एक डुएट गाणे गात आहोत. मी नवनाथ काकडे यांचे मनः पूर्वक धन्यवाद करतो की, इतके सुंदर गाणे त्यानी मला गाण्यासाठी दिले. सरपंचाच्या प्रयत्नाने गाव विकासाच्या दिशेने प्रवास सुरु करते. त्यांच्या या प्रवासाला आमच्याकडून या गाण्यातून एक धन्यवाद म्हणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे." हे गाणे ज्यांच्या संकल्पनेतून तयार झाले ते गीतकार नवनाथ काकडे यांनी सांगितले, "सिनेसृष्टीने बऱ्याचदा सरपंचावर अन्याय केला आहे. त्याची प्रतिमा अनेक चित्रपटांमधून चुकीची दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. हीच प्रतिमा दुरुस्त होवुन सरपंचांची गरिमा आणि प्रतिष्ठा लोकांसमोर आणण्याचा हे गाणे म्हणजे एक भाग आहे.”हेही वाचा -
'शार्दुल’ आणि ‘सुमी’ ला नेहमीच इच्छा होती चित्रपटातून एकत्र काम करण्याची!