कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यानंतर टेलिव्हिजन मालिकांनी जोखीम पत्करत लोकप्रिय मालिकांच्या नवीन भागांच्या चित्रीकरणास सुरुवात केली. स्टार प्रवाहांनी लॉकडाऊन काळातच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेची निर्मिती करत प्रसारण सुरु केले. स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत सध्या आनंदाचं वातावरण आहे. माईंनी गौरीचा सून म्हणून स्वीकार करुन तिला शिर्के-पाटलांच्या सुनेचे सर्व अधिकार दिले आहेत. त्यामुळे शिर्के-पाटील कुटुंबावरचं तिरस्काराचं सावट दूर झालंय. एकीकडे माईंनी गौरीला सून म्हणून स्वीकारलं आहे तर दुसरीकडे जयदीप आणि गौरीचं नातंही बहरू लागलं आहे. परंतु आता गौरीची पहिली मंगळागौर साजरी होतेय पण त्यात येणार का विघ्न?
श्रावण महिना आला की चाहूल लागते ती सणांची. श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. मंगळागौरीच्या सणाचा जल्लोष स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की असतं’ मालिकेतही पाहायला मिळणार आहे. गौरीची पहिलीच मंगळागौर असल्यामुळे साग्रसंगीत पूजा पार पडणार आहे. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने असा शिर्केपाटील कुटुंबातील सर्वच स्त्रियांचा थाट विशेष लक्ष वेधणार आहे. लाडक्या सुनेसाठी माई म्हणजेच नंदिनी शिर्केपाटील यांनी देखिल मंगळागौरीच्या खेळामध्ये सहभाग घेतला आहे.
एकीकडे उत्साहाचं वातावरण असताना जयदीपच्या अटकेने मात्र आनंदाला गालबोट लागणार आहे. मंगळागौरीची पूजा सुरु असतानाच जयदीपला अटक करण्यासाठी पोलीस दाखल होतात. जयदीपचा नेमका गुन्हा काय हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गौरीच्या पहिल्या मंगळागौरीच्या पुजेत आलेलं हे विघ्न कसं दूर होणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.
हेही वाचा - सहदेवसोबत रॅपर बादशाहने प्रदर्शित केली "बचपन का प्यार" गाण्याची नवी आवृत्ती