मुंबई - ज्यांच्या स्वप्नात जिद्द, चिकाटी मेहनत असते त्यांची स्वप्न नेहमी पूर्ण होतात, असे म्हटले जाते. निसर्ग जर कोणाकडुन काही हिरावून घेत असेल, तर त्याला दुसरी कोणत्या गोष्टीने परिपूर्ण करतो. आसामच्या जबीन कौर मुलीची कथाही अशीच आहे. जबीन ही दिव्यांग आहे. तिचे हात पुर्णत: निकामी आहेत. तरीही ती स्वबळावर तिचे सर्व कामं पूर्ण करते. तिचा हाच संघर्ष अक्षय कुमारच्या एका शो मध्ये दाखवण्यात आला आहे.
अक्षय कुमार सध्या एका शॉर्ट फिल्मवर काम करत आहे. 'शॉर्ट स्टोरीज ऑफ न्यू इंडिया विथ अक्षय कुमार', असे त्याच्या या शॉर्ट फिल्मचे नाव आहे. यामध्ये आसामच्या जबीन कौरचीही संघर्षकथा दाखविण्यात आली आहे.
जबीन ही तिची सर्व कामे पायाने पूर्ण करते. तिला इयत्ता १० वीतही चांगले गुण मिळाले आहेत. स्थानिक पत्रकारांनी तिची कथा माध्यमांमध्ये प्रसिद्ध केल्यानंतर अक्षयची नजर तिच्यावर पडली. त्याने तिची प्रेरणादायी कथा त्याच्या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणण्याचे ठरवले. त्यामुळे जबीनची कथा आता इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
आयुष्यात एखाद्या घटनेने निराश न होता आपले प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवा, असे जबीनने सांगितले आहे. तिची ही कथा इतरांनाही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास अक्षयने व्यक्त केला आहे.