खालापूर (रायगड )- मुंबई पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असणारे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून माथेरानची ओळख आहे. पर्यटन हाच येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे. माथेरानच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांची माथेरानचे ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
सिने अभिनेते आदेश बांदेकर यांच्या रुपाने माथेरानला मिळणार नवी ओळख
माथेरानमध्ये कोणत्याही प्रकारच्या वाहनाला बंदी आहे. त्यामुळे प्रदूषण विरहित स्थळ म्हणून देखील माथेरान अनेक जणांना माहिती आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माथेरानला वर्षाकाठी हजारो पर्यटक भेट देत असतात. परंतु असे असतानादेखील काही लोकांना माथेरानची अद्यापही ओळख नाही. माथेरान कुठे आहे, माथेराला कसे जायचे याबाबत महाराष्ट्रातील काही लोकांमध्ये अद्यापही माहिती नसल्याने ते अद्याप माथेरानपर्यंत पोहचू शकेलेले नाहीत. आणि त्यामुळे माथेरानच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी देशातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वाची राजदूत म्हणून निवड केली जाते. नुकताच माथेरानचे पर्यटन राजदूत अर्थात ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ म्हणून माथेरान शहरावर प्रेम असणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक, झी मराठी वाहिनीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहचलेले, तसेच शिवसेना सचिव, श्री सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांची निवड करण्यात आली आहे.
बांदेकर यांची पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड
माथेरान नगरपरिषदेच्या विशेष सभेत सर्वानुमते ठराव घेऊन त्यास मंजुरी देण्यात आली. शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने ही निवड करण्यात आली आहे. आदेश बांदेकर यांनीही ही जबाबदारी स्वखुशीने विनामोबदला स्वीकारून ती प्रामाणिकपणे पार पडण्याचा प्रयत्न करणार असल्याची भावना व्यक्त केली. तर शासनाकडून माथेरान शहराला निधी मिळण्यासाठी आणि माथेरान शहराचा नाव लौकिक वाढविण्यासाठी आदेश बांदेकर यांची नियुक्ती नक्कीच लाभदायक ठरेल, असा विश्वास यावेळी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी व्यक्त केला.
यावेळी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, गटनेते प्रसाद सावंत, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, रत्नदीप प्रधान, आदींसह नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, नागरेसेविका तसेच इतर कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.