मुंबई - अपूर्वा नेमळेकरच्या टेलिव्हिजनवरील पुनरागमनामुळे तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. लवकरच अपूर्वा ही ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘तुझं माझं जमतंय’ नवीन मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमोदेखील रिलीज झाला आहे. या प्रोमोतून अपूर्वाच्या ‘पम्मी’ या नव्या व्यक्तिरेखेची झलक देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली. पम्मीला पाहून प्रेक्षक शेवंताला विसरून जातील आणि पम्मीच्या प्रेमात पडतील असं मत अपूर्वाने व्यक्त केलं आहे. तिच्या या नव्या अवताराला सोशल मीडियावर देखील तिच्या फॅन्सनी उदंड प्रतिसाद दिला.
अपूर्वा नेमळेकर ट्रोलरला केलं निरूत्तर पण सध्या सोशल मीडियावर काही जणांना कलाकारांना ट्रोल केल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही. अशाच काही नेटिझन्सनी अपूर्वाला या प्रोमोवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अपूर्वानेही शांत न बसता त्या ट्रॉलर्सना सडेतोड उत्तर दिलं. प्रोमो पाहून एका नेटीझनने, “तुमचा लुक पाहता सगळे सिरियलवाले तुम्हाला बाहेरवालीचाच रोल देतात का?” अशी कमेंट केली. त्यावर अपूर्वाने, "या सिरियलचा एकही एपिसोड टेलिकास्ट झालेला नाही आणि तुम्ही आधीच हे ठरवून टाकलंत?" असं म्हणत त्या ट्रोलरची बोलती बंद करून टाकली. तसंच त्या ट्रोलरच्या सोशल मीडियावरील यूजरनेमवर निशाणा साधत अपूर्वा म्हणाली की, "आणि मुळात कसं आहे, नुसतं इनोसंट बॉय नाव ठेवून तुम्ही पण इनोसंट होत नाही ना." अपूर्वाच्या या बिनधास्त आणि निर्भीड उत्तर वाचून तिचे चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडलेत. आता अपूर्वाची नवीन व्यक्तिरेखा पम्मीदेखील अशीच बिनधास्त आणि निर्भीड असणार याची तिच्या चाहत्यांना जणू खात्रीच पटली आहे.