मुंबई - अभिनेत्री अनुष्का शर्माच्या क्लिन स्लेट या प्रॉडक्शनच्या वतीने तयार झालेल्या 'पाताललोक' या वेब सीरिजचे जितके कौतुक होत आहे, तितकाच टीकेचा भडीमारदेखील होत आहे. आता या मालिकेत वापरलेल्या एका डायलॉगवरून वादंग सुरू झाले आहे. यासाठी निर्माती अनुष्का शर्माला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
गिल्डचा एक सदस्य आणि वकील श्री गुरुंग यांनी निर्माती अनुष्का शर्माच्या विरुद्ध कायदेशीर नोटीस पाठवली आहे. वकिलाच्या मते सीरिजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये एक डायलॉग आहे जो संपूर्ण नेपाळी समुदायाला अपमानीत करतो. वकिलाने सांगितले, ''एका व्हिडिओ क्लिपच्या चौकशीच्यावेळी लेडी पोलीस अधिकारी नेपाळी व्यक्तिरेखेवर जातीयवादी शब्दांचा वापर करते. फक्त नेपाळी शब्दांचा वापर केला असता तर काही अडचण नव्हती, परंतु त्यानंतर जे शब्द वापरण्यात आला ते स्वीकारार्ह नाही. अनुष्का या सीरिजची निर्माती आहे म्हणून आम्ही तिला नोटीस पाठवली आहे. मात्र अजून तिच्याकडून उत्तर आलेले नाही.'''
बातमी अशीही आहे की, 'पाताललोक' मालिकेमध्ये वापरलेल्या या डायलॉगमुळे गोरखा समुदायाचे लोकही नाराज झाले आहेत. 18 मे रोजी त्यांनी ही मालिका बंद व्हावी, यासाठी ऑनलाईन पिटिशनची तयारीही सुरू केली आहे. रिलीजच्या दिवसापासूनच हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्याच्या कारणावरून 'पाताललोक' मालिकेवर बंदी आणली जावी, अशी मागणी होत आहे.
१५ मे रोजी प्राइम व्हिडिओवर ही 'पाताललोक' वेबसीरिज रिलीज झाली होती. यात जयदीप अहलावत, नीरज काबी, अभिषेक बनर्जी आणि गुल पनाग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.