नांदेड - शहरासह ग्रामीण भागातील महिलांमध्ये अनेक उपजत कलागुण आहेत. परंतु विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना संधी मिळत नसल्याने त्यांच्या कलेचा अविष्कार जनतेपर्यंत येत नाही. अशावेळी महिलांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी एखाद्या व्यासपीठाची आवश्यकता असते, यातूनच महिलांचे सक्षमीकरण होते. कुसुम महोत्सव म्हणजे महिला सक्षमीकरण्यासाठीचा कृती आराखडा होय, असे मत अभिनेते खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त नांदेडमध्ये सुरु असलेल्या कुसुम महोत्सवा अंतर्गत आयोजित केलेल्या कुसुम मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना डॉ.कोल्हे म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी आपल्या घरातून संस्कार करणे गरजेचे आहे. परिवारात मुला इतकेच मुलींनाही स्वातंत्र देणे गरजेचे आहे.राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात महिलांचाही सन्मान होता. यामुळेच अन्य राज्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याला नैतिक अधिष्ठान होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य अतुलनिय होते. मात्र त्यापेक्षा राष्ट्रमाता जिजावू यांचे संस्कार महत्वाचे होते असेही ते म्हणाले.महिला सशक्त व सक्षमीकरणासाठी शहरासह ग्रामीण भागातही व्यासपीठ उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.कुसुम महोत्सवातून महिलांसाठी उपलब्ध करुन दिलेले व्यासपीठ आशादायक व विश्वासक असल्याचेही गौरोद्गार खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी काढले आहेत.या प्रसंगी बोलताना कुसुम महोत्सवाच्या संयोजिका माजी आ. अमिताताई चव्हाण म्हणाल्या की, कुसुम महोत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी महिला सक्षमीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महिला व मुली सक्षम व्हाव्यात यासाठी शिक्षण, प्रशिक्षण तसेच लघु उद्योग करणार्या महिलांसाठीही कुसुम फाऊंडेशन माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.यातून महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.यावेळी व्यासपीठावर कुसुम महोत्सवाच्या संयोजिका माजी आ.सौ.अमिताताई चव्हाण, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, कु.श्रीजया चव्हाण, कु.सुजया चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र बने, जि.प.अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सौ.दीक्षा धबाले, गोविंदराव शिंदे नागेलीकर, गणपतराव तिडके, उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर, सभापती संजय बेळगे, सुशीलाबाई बेटमोगरेकर, प्रकाशकौर खालसा, श्रीमती मंगलाताई निमकर, सौ.शैलजा स्वामी, किशोर स्वामी, बालाजीराव जाधव, अनिताताई हिंगोले, कविता कळसकर, अनुजा तेहरा, पप्पू कोंढेकर,डॉ.रेखा पाटील, डॉ.विद्या पाटील, संतोष मुळे, छ.संभाजी महाराजांच्या वेशभूषेतील प्रेरणा भोसले यांची उपस्थिती होती.
एक वर्तुळ पूर्ण
2009 मध्ये अशोकराव चव्हाण राज्यचे मुख्यमंत्री होते. मुंबईमध्ये त्यावेळस शिवाजी पार्कवर कोल्हापूर महोत्सव भरला होता. व समोरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मालिकेचा शुभारंभ सोहळा होता. अशावेळी अशोकराव चव्हाण यांनी आम्ही आयोजित केलेल्या शुभारंभ सोहळयास उपस्थिती लावली. मला प्रोत्साहित केले. तेव्हा त्यांची झालेली ओळख व आजची येथील उपस्थिती हे एक वर्तुळ पूर्ण झाले असल्याचे खा. अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.