साधारण वीसेक वर्षांपूर्वी एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्स तर्फे ‘कुसुम’ नावाची हिंदी मालिका आली होती आणि ती खूपच लोकप्रियही झाली होती. २००१ साली ती प्रसारित झाली होती आणि त्याच मालिकेचा हा मराठी अवतार आहे. तेव्हाही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती आणि रेकॉर्ड ब्रेकर ठरली होती. कुसुम दोन दशकाच्या आधी जेव्हा आली होती तेव्हा तिने त्या काळच्या सामान्य मुलींच्या प्रश्नांना वाचा फोडली. आता जेव्हा कुसुम येतेय तेव्हा ती आताच्या काळातील मुली आणि स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते. ज्या मुलींना आपल्या कुटुंबासाठी काही करायचं आहे त्या सगळ्यांना या मालिकेतून नक्कीच प्रेरणा मिळेल.
आता तीच निर्मितीसंस्था म्हणजे बालाजी टेलिफिल्म्स, सोनी मराठीसोबत हातमिळवणी करीत त्याच नावाची मराठी मालिका घेऊन येत आहे. ‘कुसुम’ या नवीन मराठी मालिकेचे प्रोमोज सध्या प्रेक्षकांना भुरळ घालीत आहेत. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे. शिवानी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून आपल्या 'शीतली' या व्यक्तिरेखेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरांत ओळखली जाते. ‘सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज’ हे 'कुसुम' चे ब्रीदवाक्य सर्वांना आवडत आहे.
आत्तापर्यंत या मालिकेचे तीन प्रोमो आले आहेत. माहेरचं लाईट बील भरणारी, वडिलांना डॉक्टरकडे घेऊन जाणारी आणि सगळ्यांची उत्तम काळजी घेणारी कुसुम या प्रोमोमधून प्रेक्षकांना दिसली. दुनियेसाठी खपायचं आणि आई बापाला नाही जपायचं, असं कसं चालेल, असं म्हणत कुसुम सगळ्या जाबदाऱ्या उत्तम पार पाडते. आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी सतत तत्पर असलेली आणि सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या लीलया पेलणारी कुसुम. सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज, असा सगळ्या मुलींच्या मनातला प्रश्न या मालिकेतून मांडण्यात येणार आहे.
‘कुसुम’ च्या मराठी अवताराबाबत एकता कपूर म्हणाली, “२१ वर्षानंतर 'कुसुम' प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येते आहे. मी खूप आनंदी आहे. सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांसमोर 'कुसुम' आणण्याची संधी मला मिळाली. 'कुसुम' ही मालिका माझ्या खूप जवळची आहे. त्यावेळी या मालिकेने सर्व रेकॉर्ड्स ब्रेक केले होते आणि २१ वर्षांनंतर मराठीमध्ये जेव्हा कुसुम येते आहे, तेव्हाही रेकॉर्ड ब्रेक करेल, अशी मला खात्री आहे. मी मराठीमध्ये याआधीही काम केले आहे, पण खूप काळानंतर मी मराठीमध्ये पुन्हा येते आहे. प्रादेशिक भाषेमध्ये आणि खासकरून मराठीमध्ये खूप एक्सप्लोर करण्यासारखे आहे. आणि मी खूष आहे की सोनी मराठी वाहिनीने मला ही संधी दिली.”
बालाजी टेलिफिल्न्स आणि सोनी मराठी वाहिनी यांनी मिळून 'कुसुम' या मालिकेतून आजच्या काळातल्या मुलींच्या मनातले प्रश्न मांडले आहेत. सर्वच मुलींच्या मनातला प्रश्न तिने यात व्यक्त केला आहे आणि म्हणूनच कुसुम प्रेक्षकांना आपल्यातीलच एक वाटेल.
'कुसुम' ही मराठी मालिका ४ ऑक्टोबरपासून, सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा - रणबीर आलियाच्या जोधपूर सहलीचे फोटो, जोडप्याने इथे घालवले खास क्षण