मुंबई - मिर्झापूर, केसरीसह अनेक चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केलेले अभिनेता ब्रम्हा मिश्राचा मृतदेह त्याच्या घरातील बाथरूममध्ये सापडला आहे. ब्रम्हा मिश्रा हे मुंबईतील अंधेरी भागातील वर्सोवा येथील यारी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. खोलीतून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडला असता ब्रम्हा मिश्रा यांचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला.
पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत ब्रम्हा मिश्राच्या शरीरावर कुठलेही दुखापत किंवा जखम नाही, तो बाथरुममध्ये गेला असावा, तिथे त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा असा पोलिसांना संशय आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रह्म मिश्रा हा एकटाच राहत होता. दोन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा, त्यामुळे दुर्गंधी पसरू लागली.
सध्या ब्रह्म मिश्रा यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कुपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास मुंबई पोलीस करीत आहेत.
ब्रम्हाचे करियर
ब्रह्माने आपल्या करिअरमध्ये 'मांझी- द माउंटन मॅन', 'दंगल', 'केसरी', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' आणि 'हवाईजादा'सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. याशिवाय तो 'नॉट फिट' आणि 'ऑफिस व्हर्सेस ऑफिस' सारख्या शोचा भाग होता. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या 'हॅलो चार्ली' या मालिकेत तो शेवटचा दिसला होता. पण 'मिर्झापूर' सीझन 2 रिलीज झाल्यानंतर लोक त्याला ओळखू लागले.
हेही वाचा - विकी कौशलची बॅचलर पार्टी, पाहा मित्रांसोबत विवाहापूर्वीचे फोटो