भारतरत्न लता मंगेशकर यांचे या जगातून जाणे संपूर्ण देशाला चटका लावून गेले. लता दीदी ने तब्बल सात-आठ दशकं संगीताची मनोभावे सेवा केली. स्वर्गीय आवाजाचे दान घेऊन आलेल्या लता दीदीने पन्नास हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. लता दीदीला झी मराठी परिवाराकडून सुरेल आदरांजली वाहण्यात येणार आहे.
लता दीदींचं रसिक प्रेक्षकांच्या मनात असलेलं स्थान कोणीच घेऊ शकत नाही. त्यांच्या निधनामुळे संगीत व सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. लतादीदी लौकिकार्थानं आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी सुरांच्या रूपानं त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. त्यांच्या गोड आणि सुरेल आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच लता दीदींच्या सुरेल पर्वाला आदरांजली देण्यासाठी झी मराठी एक खास कार्यक्रम रविवारी १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता सादर करणार आहे.
२ तासांच्या या विशेष कार्यक्रमातून लता दीदींच्या उपस्थितीतील काही खास क्षण पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळतील. त्यांचा सुरेल आवाज पुन्हा एकदा सगळ्यांना मंत्रमुग्ध करेल. त्यांच्या या आठवणींना उजाळा देत हा विशेष कार्यक्रम प्रेक्षकांची संध्याकाळ अविस्मरणीय करेल. त्यामुळे प्रेक्षकांना लता दीदींच्या आठवणीत पुन्हा एकदा रमता येणार आहे.
लता दीदींवरील विशेष कार्यक्रम रविवार १३ फेब्रुवारी रोजी ६ वाजता प्रसारित होणार आहे.
हेही वाचा - Rhea Chakraborty Returns : २ वर्षाच्या ब्रेकनंतर रिया चक्रवर्ती पुन्हा कामावर परतली