मुंबई - महाराष्ट्रातील चित्रपटगृहे उघडली जाणार आहेत हे समजल्यावर अनेक चित्रपटांची धावपळ सुरु झाली. हिंदी चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपटही प्रदर्शन तयारी करू लागले. अनेक तयार चित्रपटांचे पोस्टर, टिझर, ट्रेलर, गाणी ई. बाहेर येऊ लागलेत. गेल्यावर्षी प्रदर्शित होणारा परंतु कोरोनाच्या विळख्यात अडकलेला मराठी चित्रपट ‘झिम्मा’ ने एक गाणे नुकतेच प्रदर्शित केले असून त्याला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळताना दिसतोय. हे उत्स्फुर्तदायी गाणे वेगवेगळ्या वयोगटातील मैत्रिणींच्या प्रवासातील मजामस्तीवर चित्रित करण्यात आले आहे. ट्रेलरमध्येच या गाण्याची झलक दिसली होती. त्यामुळे हे गाणे ऐकताना प्रत्येकाला आपल्या सहलीची आणि मैत्रीची आठवण आल्यावाचून राहणार नाही.
'झिम्मा' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाविषयची उत्सुकता प्रचंड वाढली. 'झिम्मा' कधी चित्रपटगृहात येतोय, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच आता या चित्रपटाचे शिर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे जबरदस्त गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. “खेळू झिम्मा गं.…” हे या गाण्याचे बोल असून या मोन्टाज सॅान्गचे शब्द आणि चाल संगीतप्रेमींना थिरकवणारे आहे. अमितराज यांनी या धमाल गाण्याला संगीत दिले असून वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे, आरती केळकर, सुहास जोशी यांनी हे गाणे गायले आहे.
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ हा लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट आहे. वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या स्त्रिया काही काळ जबाबदाऱ्या बाजूला ठेवत मनमुराद जगण्यासाठी इंग्लंडला जातात आणि मग काय धम्माल होते. हे लवकरच प्रेक्षकांना ‘झिम्मा’मधून पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेसृष्टीतील सात वेगळ्या धाटणीच्या अभिनेत्री एकाच चित्रपटात पाहायला मिळतील. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे.
क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' चित्रपट 19 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा - बॉलिवूड सुपरस्टार कतरीना कैफला ‘पैठणी’ देऊन गौरविले ‘भाओजी’ आदेश बांदेकर यांनी!