बालपणी नकळत्या वयात काहीतरी भीषण दृश्य किंवा प्रसंग पाहण्यात आला तर त्याचे परिणाम त्या मुलाच्या मनावर फार खोलवर होतात. त्यातून बाहेर पडणे अशक्य होऊन बसतं. त्यातही आपल्या आईवर वडिलांकडूनच अमानुष अत्याचार होताना पाहिलं असेल तर त्याचे परिणाम अंत्यत खोलवर होतात. निवृत्त सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांनी लिहिलेल्या सत्य घटनेवर आधारित 'जजमेंट' या सिनेमाची कथा ही आपल्या आईला न्याय मिळवून देणाऱ्या अशाच एका मुलीची गोष्ट आहे.
ऋतुजा साटम म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान ही अशीच एक घटनेचा ओरखडा घेऊन लहानाची मोठी झालेली मुलगी. तिचे वडील अग्निवेश साटम हे अत्यंत चिडखोर आणि कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी. उठ-सूट छोट्या कारणांसाठी बायकोला मारहाण करणारा अग्निवेश एके दिवशी लागोपाठ मुलींना जन्म का दिलास, असं म्हणत पत्नीला प्रचंड मारतो आणि रागाच्या भरात अत्यंत अमानुषपणे तिची हत्या करतो. हा सगळा प्रसंग छोटी ऋजुता आपल्या डोळ्यांनी पाहते. त्याचा तिच्या बालमनावर अत्यंत गंभीर परिणाम होतो. या घटनेनंतर अग्निवेश आपल्या पदाचा गैरवापर करून हे प्रकरण सासऱ्याच्या मदतीने दडपून टाकतो. लहानग्या ऋतुजाला न्यायालयात आईचा अपघाती मृत्यू झाल्याची खोटी साक्ष द्यायला भाग पडतो. त्यामुळे या आरोपातून तो सहीसलामत सुटतो. मात्र, या घटनेचे व्रण लहानग्या ऋतुजाच्या मनावर कायमचे कोरले जातात. त्यामुळे मोठा झाल्यावर ती आपल्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी या मृत्यूची केस पुन्हा एकदा उघडण्याचा निर्णय घेते आणि इथूनच सिनेमाची खरी कथा सुरू होते.
नीला सत्यनारायण यांची ही कथा प्रचंड आवडल्याने दिग्दर्शक समीर सुर्वे यांनी ती पडद्यावर आणण्याचा निर्णय घेतला आणि त्यात ते चांगलेच यशस्वी झालेत अस म्हणायला हवं. यापूर्वी व. पु. काळे यांची श्री पार्टनर ही कादंबरीच सिनेरूपांतर त्यांनी केलं होतं. मात्र यावेळी त्यांचा एकंदर विषय मांडण्यातील दृष्टीकोन व्यापक झाल्याचं दिसून येत.
अग्निवेश सारख्या अत्यंत क्रूर माणसाची विकृती पडद्यावर मांडताना अनेकदा सेन्सॉरच्या मर्यादा येतात. मात्र, तरीही त्यामागील भावना प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात ते कुठेही कमी पडत नाहीत. दुसरीकडे अग्निवेशची भूमिका ही अभिनेता मंगेश देसाईसाठी अत्यंत आव्हानात्मक भूमिका होती. पण भेदक नजर, अप्रतिम संवादफेक आणि अचूक हेरलेली देहबोली यामुळे ही भूमिका मंगेशने सहजरित्या साकारली आहे. हा त्याच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक गणली गेली तर नवल वाटायला नको. तर दुसरीकडे ऋतुजच्या भूमकेत तेजश्रीनेही जीव ओतून काम केलंय. फक्त 'श्री' ची जान्हवी किंवा 'ती सध्या काय करते' मधली तरुणी यापेक्षा या सिनेमातली भूमिका तिची अभिनय क्षमता सिद्ध करते. वैयक्तिक आयुष्यातील चढउतार असो की न्यायालयातील सीन्स असो प्रत्येक वेळी तेजश्रीने उत्तम तेच दिलं आहे. तिच्या या प्रयत्नांना बहीण अनाहीता साटमच्या भूमिकेतील शलाका आपटे आणि आबांची भूमिका करणारे माधव अभ्यंकर यांनी उत्तम साथ दिली आहे.
सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरलेत ते अग्निवेशच्या वकिलाच्या भूमिकेतील सतीश सलागरे आणि जज बनलेले महेंद्र तेरेदेसाई या दोघांनी मिळून काढलेल्या काही अप्रतिम पंचेसमुळे कोर्टातील प्रसंग बोअर न होता उलट जास्तच इंटरेस्टिंग झाले आहेत.
'जजमेंट' या सिनेमाच्या बाबतीत अजून एका गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे या सिनेमाचे अप्रतिम पब्लिसिटी डिझाईन. सिनेमाच प्रत्येक पोस्टर एवढं जिवंत झाल आहे की त्याच्या पहिल्या पोस्टरपासूनच त्याची दाहकता जाणवल्याशिवाय राहत नाही. बऱ्याच कादंबऱ्यांचे सिनेमे हे कधी फसतात तर कधी छान जमून जातात. जजमेंट हा दुसऱ्या प्रकारात मोडणारा सिनेमा आहे. समाजाला अंतर्मुख करायला लावणारा हा विषय असल्याने तो प्रेक्षकांना नक्की आवडेल यात शंका नाही. मात्र ऐन निवडणुकांचे निकाल लागतानाच तो रिलीज झाल्याने ही तारीख त्याला तारक ठरते की मारक यावरच या सिनेमाचं यश अपयश अवलंबून आहे.