अजय अतुल ही संगीतकार जोडी आपल्या अनोख्या संगीतासाठी प्रसिद्ध आहे. यातील अजय हा अप्रतिम गायक सुद्धा आहे. त्याला पार्श्र्वगायक म्हणून अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. नुकताच त्याने एका मराठी गाण्याला आवाज दिला आहे. आगामी 'सोयरीक' या चित्रपटासाठी यल्लमा देवीचा जागर करीत त्याने गोंधळ प्रकारातील गाणे गायले आहे.
डोई धरीला धरीला आईचा देव्हारा, भाळी लाविला लाविला देवीचा भंडारा
पाला लिंबाचा बांधिला, तुझा मळवट भरीला, तुझी भरून गं वटी, तुला निवद दाविला
आई गोंधळ मांडिला ये गं तू जागरा, येल्लू आईचा उधं उधं.....
असे बोल असणारा हा गोंधळ गीतकार वैभव देशमुख यांनी लिहिला असून संगीतकार विजय गावंडे यांनी संगीतबद्ध केला आहे.
सध्या नवरात्रैात्सवाची लगबग सुरु आहे. आदिमायेचा जागर करत तिच्या शक्तीची उपासना या दिवसात प्रत्येकजण करीत असतो. गायक संगीतकार अजय गोगावले यांनीसुद्धा यल्लमा देवीचा जागर करीत तिचा गोंधळ घातला आहे. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ची निर्मिती असलेल्या आगामी ‘सोयरीक’ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी हा गोंधळ गायला आहे.
गोंधळाबद्दल बोलताना अजय गोगावले म्हणाले की, "‘जोगवा’ नंतर ‘सोयरीक’ चित्रपटामुळे मला परत गोंधळ गाण्याची संधी मिळाली आहे. विजयसोबत याआधी काम केल्याने ‘मळवट’ या गोंधळासाठी छान ट्यूनिंग जमलं व हा गोंधळ गातानासुद्धा खूप मजा आली."
आपल्यातल्या स्वार्थ अन निस्वार्थाची लढाई यात एक हलकी धूसर रेष असते त्यावर तुम्ही कसे उभे आहात? त्यावर तुमची ‘सोयरीक’ अवलंबून असते आणि तेच मांडायचा प्रयत्न ‘सोयरीक’ चित्रपटात करण्यात आला आहे.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला आलेल्या ‘अदिती म्युझिक’ कंपनीने या गाण्याचे हक्क घेतले आहेत. मकरंद माने लिखीत दिग्दर्शित आणि विजय शिंदे, शशांक शेंडे, मकरंद माने निर्मित ‘सोयरीक’ हा कौटुंबिक धाटणीचा मनोरंजक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा - मराठी बिग बॉस 3 : स्नेहा वाघ आणि जय दुधानेमध्ये फुलतोय प्रेमाचा अंकुर?