नाशिक - महिलांच्या जीवनात येणाऱ्या रोजच्या संघर्षावर भाष्य करणारे 'बाई वजा आई' या मराठी नाटकाचा प्रयोग नुकताच नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे पार पडला. कुटुंबासाठी नोकरी करून झटणाऱ्या महिलांच्या जीवनातील संघर्षावर या नाटकातून प्रकाश टाकण्यात आला आहे. हे नाटक पाहण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.
आज महिला शिक्षण आणि जगण्याच्या तीव्र स्पर्धेमुळे अर्थाजन करू लागल्या आहेत. वाढत्या शहरीकरणात कुटुंबाचा आकार लहान होत चालला आहे. नोकरी, उद्योग, व्यवसाय या विविध कौशल्याची कामे करून स्त्री कमावती झाली. मात्र, त्याचवेळी गृहिणी पद देखील तिलाच सांभाळावे लागते. अनेकदा मातृत्वानंतर कमावणाऱ्या स्त्रीला केवळ गृहिणी व्हावे लागते. ज्या होत नाही त्यांना नोकरी आणि गृहिणी या दोन्ही दगडावर पाय ठेऊन ही कसरत करावी लागते. अशात अतिरिक्त ताण सहन करून जबाबदारी पार पाडावी लागते.
आई म्हणून ती कुठे कमी पडली, तर ती एकमेव टीकेची धनी होते. येथे भावनेचा मुद्दा त्यांच्या विरोधात जातो. बाई यशस्वी झाली यापेक्षा ती आई म्हणून किती यशस्वी आहे, यावर यशाचे मोजमाप होते. दुहेरी जबाबदारी आणि एकटीनेच सर्व संसाराचा गाडा रेटणे आणि त्यात अपयशी झाली, तर आरोपांची धनीही तिच होते. याच सर्व आशयावर 'बाई वजा आई' या नाटकातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
रेश्मा रामचंद्र यांनी सादर केलेल्या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक संजय पवार आहेत. सहाय्यक दिग्दर्शन पल्लवी पटवर्धन यांनी केलं आहे. या नाटकात सुप्रिया विनोद, वंदना सरदेसाई, राजश्री निकम, नुतन संजय, हेमांगी वेलणकर, अपर्णा क्षेमकल्याणी, गौरी शिरोळकर, रेश्मा रामचंद्र यांची मुख्य भूमिका आहे.