मोहन जोशी आणि अश्विनी एकबोटे अभिनित 'मिस यु मिस' हा चित्रपट येत्या २४ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.
विनोदीअंगाने सांगितलेली कोणतीही गोष्ट लोकांपर्यंत प्रभावीरीत्या पोहोचते. त्याचमुळे या चित्रपटातून आजच्या परिस्थितीचे वास्तविक चित्रण पाहायला मिळणार आहे. भावनाप्रधान आणि मनाला स्पर्शून जाणारी कथा या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. अहंकार आणि स्वाभिमान या दोन्हीत एक धूसर अशी रेष असते. एखाद्याचा स्वाभिमान हा लोकांना कदाचित त्याचा अहंकार वाटू शकेल आणि अहंकाराचे साधे स्वरूप म्हणजेच स्वाभिमान. ही धूसर रेष जाणूनबुजून किंवा नकळतपणे आपण पुसली तर काय होते? याचे उत्तर अगदी समर्पकरित्या आणि विनोदीपद्धतीने या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे.
आता या सिनेमात नक्की कोणी आणि का अहंकार आणि स्वाभिमान यातील अंधुक रेषा पुसली? याचे उत्तर तर सिनेमा पाहिल्यावर मिळेल. या सिनेमाला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे सभापती श्री.अमेय घोले यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी अश्विनी एकबोटे यांना चित्रपटाच्या संपूर्ण टीमने श्रद्धांजली अर्पण केली.
सुनील रघुनाथ महाडिक, क्षमा हिप्परगेकर आणि रोहनदीप सिंग यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर, जम्पिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत, ग्रे कॅट प्रोडक्शन, आर. एस. महाडिक प्रोडक्शन आणि क्षमा एंटरटेनमेंट निर्मित 'मिस यु मिस' या चित्रपटामध्ये मोहन जोशी, तेजस्वी पाटील, भाग्येश देसाई यांच्या भूमिका आहेत.