मुंबई - केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस चारलं गेलं. तिच्या तोंडात त्याचा स्फोट झाल्याने यात गंभीर जखमी झालेल्या हत्तीणीचा मृत्यू झाला. यानंतर आता या घटनेबद्दल सोशल मीडियातून रोष व्यक्त केला जात आहे. अभिनेता अर्जून कपूरनेही या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मनुष्य अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.
आपण या शर्यतीत हारलो आहोत. आपण पृथ्वीला सुरक्षित नाही ठेऊ शकलो, तिचं संरक्षण नाही करु शकलो. आपल्याशिवाय असणाऱ्या पृथ्वीवरील इतर सजीवांचा आपण आदर करु शकत नाही, असं अर्जुनने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे अर्जून म्हणाला, आपण सर्व अपयशी आहोत आणि कोणीही याबाबत वाद घालू शकत नाही. आपण त्यांचा विश्वास गमावला आहे. याची परतफेड आपल्याला करावी लागणार आहे आणि ते टाळता येणार नाही, असं म्हणत अर्जूनने हत्तीचं एक स्केचदेखील पोस्ट केलं आहे.
ही घटना 27 मे रोजी केरळच्या पलक्कड जिल्ह्यात घडली होती. घटनेनंतर जवळपास तीन दिवस ही हत्तीण वेल्लियार नदीच्या पाण्यात उभी होती. या पाण्यातच तिने प्राण सोडले. या घटनेबद्दल अर्जुनसोबतच अभिनेता अक्षय कुमार, वरुण धवन, अनुष्का शर्मा, जॉन अब्राहम, दिशा पटानी, दिया मिर्झा यांनी दुःख व्यक्त केले. सोबतच हे कृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.