मुंबई - संगीत दिग्दर्शक विशाल भारद्वाज हे संगीत क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. आपल्या संगीताने चाहत्यांवर अधिराज्य गाजवणाऱ्या विशाल भारद्वाज यांना अलिकडेच 'सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक' हा पुरस्कार मिळाला आहे. ४९ व्या केरळ राज्य पुरस्कार सोहळ्यात विशाल यांना मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विशाल यांनी २० वर्षांपूर्वी मल्याळम दिग्दर्शक वेणु यांचा पहिला मल्याळम चित्रपट 'दया' साठी संगीत दिग्दर्शन केले होते. आता पुन्हा २० वर्षानंतर त्यांच्याच दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'कार्बन' चित्रपटासाठी विशाल यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तिरुवनंतपुरम येथे २७ जुलै रोजी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
याबाबत बोलताना विशाल म्हणाले, की 'मी बऱ्याच वर्षांपासून मल्याळम चित्रपट पाहतो. त्यांच्याप्रती माझ्या मनात खूप आदर आहे. वेणू यांनी त्यांच्या चित्रपटासाठी मी संगीत द्यावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. हा खूप चांगला अनुभव होता. मला हिंदीशिवाय मल्याळम सिनेसृष्टीतही संगीत देण्याची संधी मिळाली'.
'कार्बन' चित्रपटाबाबत ते म्हणाले, की 'या चित्रपटाच्या कथेप्रमाणे संगीत निर्माण करणे खूप आव्हानात्मक होते. या चित्रपटाच्या संगीतासाठी मी दोन आठवडे केरळमध्येच गीतकारासोबत बसून अल्बमवर काम केले'. यासोबतच त्यांनी केरळच्या चाहत्यांचे आभारही व्यक्त केले.