मुंबई - दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या सुपरहिट ठरलेल्या 'राझी' चित्रपटातून विकी कौशलला वेगळी ओळख मिळाली होती. या चित्रपटात त्याने आलिया भट्टसोबत भूमिका साकारली होती. यामध्ये तो पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. आता पुन्हा एकदा मेघना गुलजार यांच्या आगामी चित्रपटासाठी विकीची वर्णी लागली आहे.
याबाबत चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी अधिकृत माहिती शेअर केली आहे. विकी कौशल फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे नाव 'सॅम' असे राहणार आहे. तर, रॉनी स्क्रुवाला हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
कोण आहेत सॅम माणेकशॉ -
- फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ हे नाव ठाऊक नसलेला क्वचित एखादा भारतीय असेल. आजपर्यंत कोणत्याही भारतीय लष्करी अधिकाऱ्याला जितकी लोकप्रियता मिळाली नाही तितकी माणेकशा यांना मिळाली. भारताचे आठवे लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांनी १९७१ मधील बांगलादेशच्या युद्धात निर्णायक विजय मिळवून सप्रमाण सिद्ध करून दाखविली. या युद्धात भारतीय लष्कराचे नेतृत्व करणाऱ्या माणेकशा यांच्या कामगिरीचा गौरव ‘फिल्ड मार्शल’ हा किताब देऊन करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय लष्कराचे ते पहिले फिल्ड मार्शल होते. त्यांचे पूर्ण नाव सॅम हॉर्मूसजी फर्मजी जमशेदजी माणेकशॉ असे होते.
- सॅम माणेकशा यांना १९४२ साली मिलेट्री क्रॉस पुरस्कार, १९६८ साली पद्मभूषण आणि १९७२ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात २७ जून २००८ साली न्यूमोनियाच्या उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांची अकरावी पुण्यतीथी आहे.
विकी कौशलला 'उरी' चित्रपटापासून फार प्रसिद्धी मिळाली आहे. त्याने त्याच्या दमदार अभिनयाची झलक या चित्रपटातून दाखवून दिली आहे. तो आता करण जोहरच्या 'तख्त' चित्रपटात भूमिका साकारत आहे. तसेच, 'भूत' चित्रपटातूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर, मेघना गुलजार यांच्या 'छपाक' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. लवकरच हा चित्रपट देखील प्रदर्शित होईल.