मुंबई - सध्या सोशल मीडियामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात दडलेले विविधांगी टॅलेंट जगासमोर येताना दिसत आहे. याच सुप्त गुण असलेल्या तरुणाईला सल्ला आणि मार्गदर्शनाची गरज असते. याची जबाबदारी घेतली आहे अल्ट्रा मीडिया अँड एन्टरटेन्मेंट ने. प्रतिभावान कलाकारांना योग्य ब्रेक मिळवून देत त्यांची सर्जनशीलता व कला जगभर सादर करणं हे या उपक्रमामागचं मुख्य उद्दिष्ट आहे. यासोबतच मनोरंजक संकल्पना घेऊन येणाऱ्या म्युझिक व्हिडिओ कंटेंट निर्मात्यांना आणि गायकांना त्यांची ऑडिओ आणि व्हिज्युअल स्वरूपात गाणी पूर्ण करण्यासाठी कंपनी मदतही करेल. पूर्ण तयार नसलेल्या कलाकृतींचे पोस्ट प्रोडक्शन अल्ट्राच्या मुंबईतील अत्याधुनिक स्टुडिओमध्ये केले जाईल. जनसंपर्क, सामाजिक आणि डिजिटल मीडिया प्रचार देखील अल्ट्राच्या विशेष इन-हाऊस टीमद्वारे केला जाईल.
‘अल्ट्रा मीडिया अँड एन्टरटेन्मेंट ग्रुप’ म्युझिक व्हिडीओ कंटेंट मेकर्स, गायक, संगीतकार आणि गीतकारांना एका अनोख्या ऑफरसाठी त्यांच्यासोबत भागीदारी करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. याअंतर्गत तयार कंटेंट घेऊन आपल्या अल्ट्रा मराठी व कृणाल म्युझिक या यूट्यूबसह इतर सोशल तसंच डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ते प्रमोट करण्यात येईल. हे कंटेंट एकाच वेळी गाना, स्पॉटिफाय, जिओसावन, अॅमेझॉन म्युझिक, आयट्यून्स, विंक म्युझिक आणि इतर आघाडीच्या म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर प्रमोट केले जाईल.
सध्या ‘अल्ट्रा मराठी’ आणि ‘कृणाल म्युझिक’ हे मराठी मनोरंजन विश्वात विविध कलाकृती निर्मीती बाबतीत आघाडीवर आहे. पारंपारिकता जपत प्रादेशिक मराठी गाणी आणि सामग्री प्रदर्शित करण्यात अल्ट्राचा हातखंडा आहे. रोमँटिक गाणी, लोकगीतं, भक्तीगीतं, लावणी, कोळीगीतं, गोंधळ, भक्ती आणि उत्सव केंद्रित गाणी अशा विविध शैलींमधील गाण्यांचा यात समावेश आहे. पारंपरिक गाणी आणि म्युझिक व्हिडीओज महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती आणि नृत्याचं दर्शन घडवणारी आहेत. थेट प्रेक्षकांच्या आवडीशी कनेक्ट होणाऱ्या अशा प्रकारच्या गाण्यांचं जगभरातील संगीतप्रेमींकडून कौतुक होत आहे.
2000 मध्ये स्थापन झालेली 'कृणाल म्युझिक' विविध शैलींमधील आकर्षक संगीत व्हिडिओ सामग्री तयार करण्यात आघाडीवर आहे. 2012 मध्ये ही अल्ट्रा मीडिया आणि एन्टरटेन्मेंट ग्रुपनं विकत घेतल्यानंतर एकत्रितपणे प्रतिभावान निर्मात्यांकडून विविध प्रकारची सामग्री घेऊन त्यांचा स्वतःचा आशय तयार करण्यासाठी वापर केला जात होता. 'मंदामाई शिकलेली नव्हती का', 'लिंबू कापलं', 'हलगी वाजती', 'कुरळे कुरळे केस' आदी अलीकडच्या काळात अल्ट्राची गाजलेली गाणी अनिमेश ठाकूर, साक्षी चौहान, दया नाईक, मयूर नाईक आणि जयेश पाटील या आघाडीच्या गायकांनी गायली आहेत.
अल्ट्रा मीडिया अँड एन्टरटेन्मेंट ग्रुपचे सीईओ श्री. सुशिलकुमार अग्रवाल म्हणाले की, "अल्ट्रा नेहमीच नवीन प्रतिभावान कलाकारांबरोबर काम करत विविध सांगितीक प्रकारांना प्रोत्साहन देण्याच्या संधी शोधत असते. रसिकांचा दृष्टीकोन समोर ठेवून त्यांच्या आवडीनिवडी जोपासत निर्मिती करण्याकडे कायम आमचा कल असतो. आजच्या काळातील वाढती प्रेक्षकसंख्या मराठी व्हिडिओ आणि गाण्यांच्या विविध श्रेणी पाहण्याचे पर्याय निवडत आहे. हा उद्योग सध्या एका अतिशय मनोरंजक टप्प्यातून जात आहे. अशावेळी प्रतिभावान निर्मात्यांसाठी काम करण्याची आमची इच्छा आहे. त्यांच्या प्रतिभेचा प्रचार आणि प्रसार आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने जागतिक पातळीवरील प्रेक्षकांसमोर सादर करणार आहोत."
अल्ट्रा मराठी हे अल्ट्राच्या लेबलमधील एक प्रमुख मराठी यूट्यूब चॅनेल आहे. हे मनोरंजक आणि आकर्षक मराठी कलाकृती सातत्याने प्रसारित करीत असतात. चित्रपट गीतं, मनोरंजक चित्रपट दृश्ये, जुने मराठी क्लासिक चित्रपट, मनोरंजक स्किट्स आणि नाटकांची विस्तृत श्रेणी चॅनेलच्या माध्यमातून नियमितपणे प्रदर्शित केली जाते. अल्ट्रा मराठी, कृणाल म्युझिक आणि अल्ट्रा मराठी बझ या अल्ट्राच्या तीन प्रमुख मराठी यूट्यूब चॅनेल्सचे 41.5 दशलक्ष ग्राहक असून, जगभर 200 अब्जांहून अधिक प्रेक्षकसंख्या आहे.
हेही वाचा - BREAKING : आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईलला एनसीबीकडून समन्स