मुंबई - सौंदर्यतेचे निकष बदलत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज वाढदिवस आहे. शिल्पा आज बॉलिवूडची सर्वात फिटेस्ट अभिनेत्रीमध्ये गणली जाते. सुरुवातीला मॉडेल म्हणून तिने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. शाहरुख आणि काजोलसोबत तिने 'बाजीगर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या आयुष्यात अनेक चढउतारांना ती सामोरी गेली. यात काही अशाही घटना आहेत ज्यांमुळे तिचे संपूर्ण आयुष्यच पालटले. तिच्या वाढदिवसानिमित्त एक नजर टाकूयात अशाच काही घटनांवर...
शिल्पा शेट्टीने सुरुवातीला जेव्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती, तेव्हा तिला सलग अपयशाचा सामना करावा लागला. त्यानंतर तिला अक्षय कुमारसोबत 'मै खिलाडी तू अनाडी' चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम दिले. त्यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना फारच आवडली होती. या चित्रपटानंतरच अक्षय आणि शिल्पाच्या नात्याच्या चर्चादेखील रंगल्या होत्या. त्यानंतर २००२ साली आलेल्या 'धडकन' चित्रपटानेही प्रेक्षकांची मने जिंकली. 'धडकन' चित्रपट हा शिल्पाच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता.
अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी हे कपल बॉलिवूडचे हॉट कपल मानले जाऊ लागले. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, दोघे लग्नबंधनातही अडकणार होते. मात्र, पुढे अक्षयचे आणि रविना टंडनच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे शिल्पा आणि अक्षय वेगळे झाले. अक्षयसोबत ब्रेकअप झाल्यानंतर शिल्पा मानसिक तनावाखाली गेली होती, असे तिनेच एका माध्यमाशी बोलताना सांगितले होते.
शिल्पाने आतंरराष्ट्रीय टीव्ही शो बिग ब्रदरमध्येही सहभाग घेतला होता. या शोची ती विजेती ठरली होती. हादेखील तिच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा होता.
त्यानंतर शिल्पाने २२ नोव्हेंबर २००९ रोजी उद्योगपती राज कुंद्रासोबत लग्नगाठ बांधली. राज कुंद्राचे दुसरे लग्न होते. आता शिल्पा आणि राज कुंद्रा यांची जोडी एक 'कपल गोल' म्हणून ओळखली जाते. त्यांना विवान नावाचा मुलगा देखील आहे.
शिल्पाने अभिनयासोबतच योगामध्येही यश मिळवले आहे. चाहत्यांना ती वेगवेगळ्या योगा पद्धती शिकवत असते. तिचे एक यूट्यूब चॅनलही आहे. या चॅनलद्वारे ती आरोग्यवर्धक आहाराच्या रेसीपी शिकवते. तसेच, योगादेखील शिकवते. छोट्या पडद्यावर ती 'सुपर डान्सर' या कार्यक्रमाचे परीक्षणही करते.