सोलापूर - 'ती सध्या काय करते' या चित्रपटातील बाल अभिनेत्री निर्मोही अग्नीहोत्री सध्या अभिनयाचे धडे गिरवत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित सुशील करंडक स्पर्धेच्या निमित्ताने निर्मोहीने येथे अभिनयातील कलाविष्कार जवळून पाहिले. यावेळी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने तिच्याशी संवाद साधला.
निर्मोहीने 'ती सध्या काय करते' या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तिने या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचे बरेच कौतुक झाले होते. सध्या ती ९ व्या वर्गात शिकत आहे. शालेय अभ्यासासोबतच तिने कलाक्षेत्राचा म्हणजे अभिनयाचा अभ्यासही सुरू ठेवला आहे. सेलेब्रिटी बनल्यानंतर तिने बालनाट्य स्पर्धेतही सहभाग घेतला होता. आता मोठ्या स्पर्धांमधून आपला अभिनय आणखी समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तिने यावेळी म्हटले.
निर्मोहीला आई सरिता अग्निहोत्री यांच्याकडून प्रेरणा मिळते. तिच्या कलागुणांना आणखी वाव मिळावा, यासाठी राज्य नाट्य स्पर्धांच्या माध्यमातून तिला समोर आणण्याचा प्रयत्न तिच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे.
हेही वाचा -अॅक्शन अवतारात झळकणार कार्तिक आर्यन, 'तान्हाजी'च्या दिग्दर्शकासोबत करणार काम