मुंबई - भारतात 60% तरुणाई असल्यामुळे, कदाचित, व्हॅलेंटाईन डे बऱ्यापैकी जोशात साजरा होतो. या दिवसाचे औचित्य साधून अनेक फिल्म मेकर्स आपापल्या रोमँटिक चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना अवगत करत असतात. या दिवसाचे निमित्त साधून 'हरिओम' सिनेमाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. रोमँटिक आणि प्रेमाच्या रंगात रंगलेल्या जोडप्याचे हे पोस्टर खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. पोस्टरमध्ये दिसणारे सिनेमातील मुख्य नायक आणि नायिका असावे असा अंदाज बांधला जात आहे. मात्र या दोघांचा चेहरा मात्र दिसत नाहीये. गुलाबांच्या पाकळ्यांमागे आणि फुग्यांमागे त्यांचा चेहेरा लपला आहे. त्यामुळे हे दोघे नक्की कोण आहेत हे अद्यापही समजले नसले, तरी प्रेक्षकांच्या मनात ते जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण झाली आहे.
‘हरिओम' या चित्रपटाचे निर्माते हरिओम घाडगे आणि दिग्दर्शक आशिष नेवाळकर असून हा सिनेमा श्रीहरी स्टुडिओची प्रस्तुती असणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते. या चित्रपटाच्या टीमने ते पोस्टर छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केले होते. पहिले पोस्टर पाहून हा सिनेमा ॲक्शनपट असेल असा अंदाज लावण्यात येत होता, परंतु आता या सिनेमाचे दुसरे पोस्टर पाहून हा सिनेमा रोमँटिक सिनेमा असावा असे वाटत आहे. मात्र हा सिनेमा एक कौटुंबिक सिनेमा आहे असेही कळते आहे. अद्याप ‘हरिओम’ या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली नसली तरी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा - व्हॅलेंटाईन विशेष : प्रेमा तुझा 'राजकीय' रंग कसा?