मुंबई - ख्यातनाम निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याचा 'डी कंपनी' हा चित्रपट २६ मार्चला रिलीज होणार होता. मात्र या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचे ट्विट रामूने केले आहे. देशभर वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे रिलीज पुढे ढकलल्याचे त्याने म्हटलंय.
राम गोपाल वर्माने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, ''देशात कोविडची गंभीर स्थिती पुन्हा निर्माण झाल्यामुळे आणि नवीन लॉकडाऊनच्या बातम्या येत असल्यामुळे 'डी कंपनी' या चित्रपटाचे प्रदर्शन स्पार्कने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. रिलीजची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.''
मात्र, राम गोपाल वर्मा काही तरी लपवत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टन इंडिया सिने एम्पलॉईज (एफड्ब्यूआयसीई)ने युएफओ मुव्हीजच्या सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टरला एक पत्र पाठवून राम गोपाल वर्माचा 'डी कंपनी' या चित्रपटाचे रिलीज थांबवण्यासाठी पत्र लिहिले आहे.
एफड्ब्यूआयसीईकडे सिने कर्माचाऱ्यांचा काही तक्रारी आल्या आहेत. राम गोपाल वर्मासाठी काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे पैसे त्यांना मिळालेले नाहीत. यासाठी त्यांच्या कार्यलयाशी संपर्क करुनही त्यांनी यावर तोडगा काढलेला नाही. त्यामुळे निर्मात्यावर कडक कारवाई करण्याची वेळ आली आहे, असे एफड्ब्यूआयसीईने आपल्या पत्रात म्हटले आहे.
राम गोपाल वर्माला देशभर सिने निर्मितीमध्ये सहकार्य न करण्याचा निर्णय एफड्ब्यूआयसीईने घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युएफओ मुव्हीजच्या वतीने 'डी कंपनी' चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात येणार असल्याचे समजल्यामुळे हा प्रश्न सुटेपर्यंत 'डी कंपनी'चे रिलीज रोखण्यात यावे अशी विनंती एफड्ब्यूआयसीईने युएफओ मुव्हीजला केली आहे.
हेही वाचा - ‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या सेटवर पोहोचला गतकाळचा प्रसिद्ध ‘हिरो’ जितेंद्र!