मुंबई - 'साहो'च्या प्रमोशनसाठी प्रभाससह चित्रपटाची टीम 'द कपील शर्मा शो'मध्ये येणार आहे. प्रभास आणि श्रध्दाने यामध्ये कपील शर्मासोबत धमाल उडवून दिली आहे. प्रश्नांपासून लांब राहणारा, अबोल म्हणून ओळखला जाणारा प्रभास कपीलच्या मिश्कील प्रश्नांना कशी उत्तरे देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सोनी टीव्हीने एक 'द कपील शर्मा शो'चा एक प्रोमो रिलीज केला आहे. यात प्रभासला बोलते करण्याचा प्रयत्न कपीलने खूबीने केल्याचे दिसते. एका प्रश्नावर तर प्रभासने दिलेले उत्तर मिश्किल तर होतेच पण त्याच्यातील हजरजबाबीपणा आणि मुत्सद्दीगिरीची झलक दाखवणारे होते.
कपील प्रभासला विचारतो की, जर एक दिवसासाठी पंतप्रधान झालास तर काय करशील? याला उत्तर देताना प्रभास म्हणतो, 'इंडस्ट्रीमध्ये मुलाखती देणे बंद करेन.' त्याच्या या उत्तराने सर्वजण चकित झाले आणि प्रेक्षक हास्यरसात बुडाले.
'साहो' चित्रपटात दोन हजार कोटीची चोरी दाखवण्यात आलीय. यावर कपीलने एक मिश्किल चिमटा घेतला. तो म्हणाला, 'ज्या चित्रपटात प्रभास असेल त्यात चोरी २ हजार कोटींचीच होईल कारण १० कोटीची चोरी दाखवली तर डायरेक्टर म्हणेल की १०० कोटी तर प्रभासच घेतोय. त्यामुळे चोरीही मोठी असायला हवी.'
या शोमध्ये नील नितीन मुकेश, श्रध्दा यांच्याशीदेखील कपीलने भरपूर मजामस्ती केली आहे. शोमधील इतर कलाकार काय धमाल उडवून देतात हे शोच्या प्रसारणातच कळेल. 'साहो' चित्रपट ३० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.