मुंबई - वडील सुनील दत्त यांनी बनवलेल्या करमणूकप्रधान पण आशयघन सिनेमांसारखे सिनेमे बनवण्याची इच्छा अभिनेते संजय दत्त याने व्यक्त केली आहे. संजय दत्त प्रोडक्शन्स आणि ब्लु मस्तांग क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या 'बाबा' या सिनेमाचा ट्रेलर लाँचिंग सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी सिनेमाचा निर्माता संजय दत्त हा खास पाहुणा म्हणून उपस्थित होता.
वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित 'बाबा' या सिनेमाची निर्मिती करण्यामागे या नात्याभोवती आपल्या भावना जुळलेल्या असल्याचे संजयने सांगितले. संजयच्या निर्मिती संस्थेची जबाबदारी संपूर्णपणे त्याची पत्नी मान्यता हिने आपाल्या हातात घेतल्यानेच हे शक्य झाल्याचेही त्याने सांगितले. मराठी सिनेमा बनवण्याची आपली इच्छा होती, त्यामुळेच सुरुवात मराठी सिनेमाद्वारे केल्याचेही त्याने सांगितले. मात्र, यानंतर 'बँक लोन' या पंजाबी सिनेमाची निर्मिती करणार असल्याचे मान्यता हिने यावेळी सांगितले. या वर्षाच्या अखेरीस हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
'बाबा' या सिनेमाचे नाव आपल्या टोपणनावावरून ठेवल्याचा आपल्याला विशेष आनंद झाल्याचे यावेळी संजयने मान्य केले. या सिनेमात बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता दीपक दोबरीयाल हा मराठीत पदार्पण करत आहे. तर त्याच्यासोबत या सिनेमामध्ये नंदिता धुरी, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. येत्या 2 ऑगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज होईल.