मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नूच्या आगामी 'थप्पड' चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत या ट्रेलरला १० मिलियन पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. तापसीने आपल्या इन्स्टास्टोरीमध्ये या ट्रेलरची झलक शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
'थप्पड' हा चित्रपट महिलांवर होणाऱ्या घरगुती हिंसाचारावर आधारित आहे. एखाद्या नात्यात बंदिस्त झाल्यावर एका चापटीमुळे एखाद्या महिलेचे आयुष्य कसे बदलते याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
हेही वाचा -नाशिक सुला फेस्ट : सलीम-सुलेमानच्या संगीतावर थिरकली तरुणाई
महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या घटना नेहमी आपल्या जवळपास घडत असतात. एखाद्या कारणावरून स्त्रियांवर हात उचलणे, तिला मारहाण करणे या गोष्टी सहज घडतात. मात्र, त्यावर कोणीही प्रश्न विचारत नाही. समाजाच्या भीतीमुळे किंवा नातं टिकवून ठेवण्यासाठी अशा गोष्टी लपवून ठेवल्या जातात. पण एक थप्पडही तो मारू शकत नाही, तसे मारण्याचा त्याला काही अधिकार नाही, हेच या ट्रेलरमधून दाखवण्यात आले आहे.
अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तापसीसोबत यामध्ये रत्ना पाठक, मानव कौल, दिया मिर्झा, तन्वी आझमी आणि राम कपूर यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहेत. २८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -गश्मीर महाजनी - पूजा सावंतची कोळीवाड्यात धमाल बाईक राईड, पाहा व्हिडिओ