मुंबई - कोरोना महामारीमुळे चित्रपटसृष्टीतील घडामोडी अस्ताव्यस्त झाल्या असं म्हणता येईल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे सध्या हिंदी चित्रपटांची प्रदर्शनं पुढे ढकलली जाताहेत आणि मराठी चित्रपटांना ही संधी आहे विना-स्पर्धा तिकीटबारीबर धंदा करण्याची. आता लवकरच आणखी एक जबरदस्त मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘विशू’ असे या चित्रपटाचे नाव असून गश्मीर महाजनी विशूच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे.
‘विशू’ची कथा मयूर मधुकर शिंदे यांची असून पटकथा आणि संवाद हृषिकेश कोळी यांचे आहेत. या चित्रपटाला ऋषिकेश कामेरकर यांचे संगीत लाभले असून गाण्यांचे बोल मंगेश कांगणे यांचे आहेत. तर छायाचित्रणाची धुरा मोहित जाधव यांनी सांभाळली आहे. ‘विशू’ चे निर्माते श्री कृपा प्रॅाडक्शनचे बरेच चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
चित्रपटाच्या पोस्टरवर नायक ‘विशू’ निसर्गरम्य अशा कोकणातील समुद्रात, निरभ्र आकाशाखाली, बोटीवर मंद लाटांच्या हेलकाव्यात पहुडलेला दिसत आहे. त्याच्या मनात नक्की कोणते वादळ सुरु आहे, हे जाणून घेण्यासाठी मात्र १ एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. एक अनोखी प्रेमकथा असणाऱ्या या चित्रपटात गश्मीरसोबत मृण्मयी गोडबोले, ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी अशी तगडी स्टारकास्ट आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणतात, ‘’या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मी खूपच उत्सुक आहे. गश्मीर, मृण्मयी बरोबरच विशूमधील सगळ्याच कलाकारांसोबत काम करताना खूप मजा आली. मुळात हे सगळेच कसलेले कलाकार आहेत. दोन परस्परविरोधी स्वभाव जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होते, हे एका गोड प्रेमकहाणीमधून दाखवण्याचा प्रयत्न ‘विशू’मधून करण्यात आला आहे. मला खात्री आहे, हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.’’
श्री कृपा प्रॅाडक्शनचा ‘विशू’ हा प्रदर्शित होणारा दुसरा चित्रपट असून येत्या १ एप्रिल २०२२ ला ‘विशू’ महाराष्ट्रातील सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - सुशांत सिंह राजपुत जन्मदिन : टीव्ही ते मोठ्या पडद्यापर्यंतचा संस्मरणीय चित्र प्रवास